घोगळ हाऊसिंग बोर्ड येथे चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू

फातोर्डा पोलिसांनी दोन संशयितांना केली अटक

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
4 hours ago
घोगळ हाऊसिंग बोर्ड येथे चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू

मडगाव : घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीबाहेर नमाजानंतर झालेल्या चाकू हल्ल्यात अली कलंदर खान (३७) या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे.

घोगळ हाउसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशीद आणि मदरसा येथे नमाजासाठी गेले असताना अली कलंदर खान यांच्यावर हा खुनी हल्ला झाला. नमाज संपल्यानंतर मशिदीच्या आवारातच संशयितांनी अली खान यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मशिदीबाहेर त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात अली खान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालय परिसरात लोकांची मोठी गर्दी जमली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मशिदीच्या व्यवस्थापनावरून वाद सुरू होता. महबूब मकानदार, शब्बीर खान आणि त्यांच्या साथीदारांकडून मशिदीच्या कामकाजात अडथळा आणला जात असून, बेकायदेशीररीत्या निधी गोळा केला जात असल्याची तक्रार यापूर्वीच दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती. याच जुन्या वादातून हा जीवघेणा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अली खान यांच्या मृत्यूनंतर फातोर्डा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलीस अधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून या प्रकरणातील दोन संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. जिल्हा रुग्णालयाबाहेर सायंकाळपर्यंत तणावपूर्ण शांतता असून लोकांचा जमाव जमलेला होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत


हेही वाचा