मराठी प्राथमिक शाळांत ३५२, तर कोकणी शाळांत ३८ शिक्षकांची होणार भरती

कर्मचारी भरती आयोगाने इच्छुकांकडून मागवले अर्ज

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
5 hours ago
मराठी प्राथमिक शाळांत ३५२, तर कोकणी शाळांत ३८ शिक्षकांची होणार भरती

पणजी : राज्य कर्मचारी भरती आयोगाने मराठी प्राथमिक शाळांमध्ये ३५२, तर कोकणी शाळांमध्ये ३८ शिक्षकांची पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन स्वरूपात २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज https://gssc.goa.gov.in या संकेतस्थळावर भरून सादर करावेत.

मराठी शिक्षकांच्या ३५२ पदांपैकी १५८ पदे सर्वसाधारण (Open/UR) प्रवर्गासाठी आहेत. उर्वरित पदे अनुसूचित जमाती (ST) ४२, अनुसूचित जाती (SC) ४, इतर मागासवर्गीय (OBC) ११३ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) ३५ अशी राखीव आहेत. तसेच, एकूण ३५२ पदांपैकी १६ पदे दिव्यांगांसाठी, ७ पदे माजी सैनिकांसाठी (Ex-Servicemen), तर ८ पदे क्रीडापटूंसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

कोकणी शिक्षकांच्या ३८ पदांपैकी १९ पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत. उर्वरित पदांपैकी ओबीसीसाठी १५, तर ४ पदे ईडब्ल्यूएससाठी राखीव आहेत. या ३८ पदांपैकी ८ पदे दिव्यांगांसाठी आरक्षित आहेत.

उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT) परीक्षेतील गुणांनुसार होणार आहे. पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही सीबीटी परीक्षांचा अभ्यासक्रम जाहिरातीसह संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पात्रता:

उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण (HSSC) असण्यासह डी.एड. (D.Ed) किंवा बी.एड. (B.Ed - सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स आवश्यक) ही शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे. यासोबतच दोन वर्षे प्राथमिक शाळेत शिकविण्याचा अनुभव आणि गोवा शिक्षक पात्रता चाचणी (GTET) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा