सहा स्टेशन्समधून मागवले बंब; सहा तासांनंतर आग आटोक्यात

मडगाव: दवर्ली येथील 'श्री गौलक्ष्मी सॉ मिल'मध्ये शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. मडगावसह वेर्णा, कुंकळ्ळी, फोंडा, कुडचडे आणि पणजी येथील अग्निशामक दलाच्या गाड्यांनी पाण्याचा मारा करून सुमारे सहा तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले असून, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या सॉ मिलमध्ये अग्निसुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे.
मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गिल सुझा यांनी सांगितले की, पहाटे पावणेतीन वाजता दवर्ली येथील श्री गौलक्ष्मी सॉ मिलमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. तत्काळ अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी रवाना करण्यात आली. सॉ मिलच्या एका बाजूला यंत्रसामग्री (मशिनरी) आणि लाकडांचा साठा करून ठेवला होता. येथे मॉल्डिंग आणि बीम करण्याची प्रक्रिया केली जात असे. दिवसा या ठिकाणी काम चालते, मात्र रात्री तिथे कोणीही नसताना ही घटना घडली. विशेष म्हणजे, या शेडच्या बाजूलाच कामगारांची घरे आहेत.

आगीने धारण केलेले विक्राळ स्वरूप पाहून तत्काळ इतर केंद्रांकडून मदत मागवण्यात आली. त्यानुसार वेर्णा, कुंकळ्ळी, कुडचडे, फोंडा आणि पणजी येथील मुख्य कार्यालयातून गाड्या बोलावण्यात आल्या. या सहा केंद्रांच्या गाड्यांनी मिळून सुमारे दहा फेऱ्यांद्वारे पाण्याचा अविरत मारा केला. सॉ मिलच्या ज्या शेडमध्ये आग लागली, ते रात्री बंद होते. कामगारांना आगीची चाहूल लागताच त्यांनी मालकांना कल्पना दिली आणि त्यानंतर मालक पटेल यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. या आगीत महागडी यंत्रसामग्री आणि लाकडाचा साठा जळून खाक झाला आहे. नुकसानीचा नेमका आकडा सॉ मिल मालकांकडून अद्याप अधिकृतपणे दिला गेलेला नाही.

शॉर्ट सर्किटचा अंदाज
सॉ मिलचे मालक कमलेश पटेल यांनी सांगितले की, पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली होती, कामगारांनी अडीच वाजता माहिती दिली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काहीही स्पष्ट दिसत नाही, ते पोलिसांना दाखवण्यात आले आहे. यंत्रसामग्री, शेड आणि इतर साहित्याचे मिळून सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले.

अग्निसुरक्षेचा अभाव
सॉ मिल बंद असताना आग कशी लागली, याबाबत संभ्रम आहे. सुरक्षारक्षकाचे वडील आजारी असल्याने तो त्या रात्री कामावर नव्हता, असे पटेल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आगीपासून संरक्षणासाठी काही उपाययोजना केल्या आहेत का, असे विचारले असता, सॉ मिलमध्ये तशी कोणतीही यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. यापूर्वी अशी घटना कधीच घडली नव्हती, असेही सांगण्यात आले.