
पणजी : कला, विज्ञान शाखेची पदवी घेऊन एलडीसीची (LDC) नोकरी मागण्याचे दिवस गेले आहेत. गोव्यात (Goa) अनेक नवीन करिअर संधी उपलब्ध झाल्या आहेत. याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा; असे आवाहन मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ प्रमोद सावंत यांनी केले. शुक्रवारी पणजीत (Panjim) आयोजित करिअर मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात, सचिव संदीप जॅकीस, राजेश आजगावकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, आयटीआय (ITI) पासून आयआयटी (IIT) पर्यंत अनेक शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. येथे विविध राष्ट्रीय संशोधन, शिक्षण संस्थेत देखील संधी आहेत. स्थानिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ करून घेणे आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगातील रोबोटिक, डेटा सायन्स, गेम डेव्हलपमेंट, एआय, सायबर सुरक्षा, डिजिटल मीडिया असे विविध करियर पर्याय समजून घ्यावेत. केवळ गोव्यातच नोकरी, रोजगार करणार असा आग्रह नको. चांगली संधी मिळाली तर देशात, जगात कुठेही काम करण्याची तयारी असावी.
ते म्हणाले, राज्य सरकारने स्टार्टअप, लॉजिस्टिक धोरण आणले आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा आत्तापासूनच अभ्यास केल्यास शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला या क्षेत्रात नेमके कोणते करियर करायचे हे त्यांना समजेल. विद्यार्थ्यांनी राज्यातील पर्यटन, लॉजिस्टिक, एविएशन, मत्स्यव्यवसाय, जहाज बांधणी आदी क्षेत्रातील करियर संधी शोधाव्यात. यासाठी सरकारने सुरू केलेल्या शिष्यवृत्ती , कर्ज व अन्य योजनांचा फायदा करून घ्यावा. विद्यार्थ्यांनी विकसित भारत तसेच विकसित गोवासाठी योगदान द्यावे. यासाठी मोठा विचार करणे आवश्यक आहे.