बँक कर्ज फसवणूकप्रकरणी माजी कर्मचाऱ्यासह दोघे दोषी

२ फेब्रुवारी रोजी सुनावणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
33 mins ago
बँक कर्ज फसवणूकप्रकरणी माजी कर्मचाऱ्यासह दोघे दोषी

पणजी : बँक कर्ज फसवणूकप्रकरणी कॅनरा बँकेचे माजी अधिकारी वलिवेटी वेंकट नरसिम्हा शास्त्री आणि यासीन एम. शेख या दोघांना मेरशी येथील विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. याबाबतचा आदेश न्या. ईर्शाद आगा यांनी दिला. दरम्यान, शिक्षेवर सोमवार २ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

या प्रकरणी कॅनरा बँकेच्या फोंडा शाखेने २०११ मध्ये केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, तत्कालीन निरीक्षक नीलेश शिरोडकर यांनी सीबीआयच्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्यानुसार, फोंडा शाखेतील कॅनरा बँकचे तत्कालीन अधिकारी वलिवेटी वेंकट नरसिम्हा शास्त्री यांनी बँकेचे ग्राहक यासीन शेख यांना त्यांच्या आधीच्या मालकीच्या हुंडाई कारसाठी ५ लाख रुपयांचे कार मोबाईल कर्ज मंजूर केले होते. त्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून वाहनाची पूर्व मालकी लपवली गेली होती. याच दरम्यान याशीन शेख याने कोल्हापूर शाखेकडून त्याच वाहनासाठी दुसरे ५ लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले होते. त्यामुळे शास्त्री यांनी बँक नियमांचे उल्लंघन करून अधिकाराचा गैरवापर करून खासगी व्यक्तीला मदत केली. तसेच बँकेचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले होते.

या प्रकरणी तपास पूर्ण करून निरीक्षक शिरोडकर यांनी वरील दोन्ही आरोपी विरोधात उत्तर गोवा विशेष न्यायालयात षड्‌यंत्र रचणे, फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली आरोपपत्र दाखल केले होते. तसेच अशाच पद्धतीचे आरोपपत्र कोल्हापूर न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू आहे. तर, गोव्याच्या न्यायालयात सीबीआयतर्फे विशेष अभियोक्ता मंजित सिंग यांनी बाजू मांडून आरोपी विरोधात पुरावे सादर केले. दरम्यान, विशेष न्यायालयाचे न्या. ईर्शाद आगा यांनी पुराव्याची दखल घेऊन दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. शिक्षेवर सोमवार २ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. 

हेही वाचा