लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यास सुखविंदर सिंगला मोकळीक

सोनाली फोगट खून प्रकरण : जामिनाला आव्हान फेटाळले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
35 mins ago
लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यास सुखविंदर सिंगला मोकळीक

पणजी : भाजपच्या महिला नेत्या सोनाली फोगट यांच्या खून प्रकरणातील संशयित सुखविंदर सिंग याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थायलंड आणि दुबईत जाण्याची परवानगी मेरशी येथील सत्र न्यायालयाने दिली होती. या आदेशाला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात दिलेले आव्हान न्यायालयाने फेटाळून लावले. त्यामुळे संशयित सुखविंदर सिंग याला त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यास मोकळीक मिळाली. याबाबतचा आदेश न्या. वाल्मिकी मिनिझीस यांनी दिला आहे.

सोनाली फोगट ही तिचे सहकारी सुधीर पाल सांघवा आणि सुखविंदर सिंग यांच्यासह २२ ऑगस्ट २०२२ रोजी गोव्यात आली होती. त्यानंतर ते सर्व ग्रॅण्ड लिओनी हॉटेलमध्ये उतरले होते. नंतर दुसऱ्याच दिवशी २३ ऑगस्ट २०२२ रोजी सोनाली फोगट हिचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. या प्रकरणी फोगट यांचा भाऊ रिंकू ढाका यांच्या तक्रारीनंतर हणजूण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिचे साथीदार सांघवा व सिंग यांना अटक केली होती. दरम्यान हे प्रकरण केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग केले आहे. या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने सुखविंदर सिंग याला सशर्त जामीन मंजूर केला होता.

दरम्यान, खून प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यामुळे वैवाहिक संबंध बिघडत आहेत. पत्नीसोबतचे नाते सुधारण्यासाठी आणि १८ फेब्रुवारी रोजी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने थायलंड आणि दुबईत विदेश प्रवास करण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून मागणी केली होती. त्यात त्यांनी ३० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत थायलंडमधील फुकेत आणि त्यानंतर दुबईला जाण्यास न्यायालयात परवानगी मागितली होती. सुखविंदरवर भा. दं. सं.च्या कलम ३०२ (खून) अंतर्गत गंभीर गुन्हा नोंद आहे. तसेच तो परदेशातून फरार होण्याची शक्यता वर्तून परवानगी नाकारण्याची मागणी सीबीआयने केली होती. या प्रकरणी सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी ‘विशिष्ट परिस्थिती’ विचारात घेऊन सुखविंदरला प्रवासासाठी सशर्त परवानगी दिली होती. या आदेशाला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणी उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या आदेश कायम ठेवला. त्यामुळे संशयित सुखविंदर सिंग याला लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थायलंड आणि दुबईत जाण्याची मोकळीक प्राप्त झाली.