नितीन नबीन यांचे जल्लोषात स्वागत : आज ताळगावात मेळावा

पणजी भाजप मुख्यालयाजवळ आयोजित कार्यक्रमात भाजपाध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री दिगंबर कामत, मंत्री रमेश तवडकर व इतर. (नारायण पिसुर्लेकर)
....
प्रतिनिधी। गाेवन वार्ता
पणजी : भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांचे शुक्रवारी गोव्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाजपचे आमदार, मंत्र्यांना त्यांनी संघटन आणि निवडणूक रणनीतीवर मार्गदर्शन केले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर व्यक्त केला.
अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नबीन प्रथमच गोव्यात आले आहेत. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस ते गोव्यात आहेत. ढोल, ताशासह संगीताच्या ठेक्यात कार्यकर्त्यांनी त्यांचे पणजीत स्वागत केले. नबीन यांचे शुक्रवारी सकाळी मोपा विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार प्रवीण आर्लेकर, प्रेमेंद शेट आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. नंतर त्यांनी पणजीतील भाजप कार्यालयाला भेट दिली. कार्यालयानजीक फुलांचा वर्षावर आणि हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी पणजीतील हॉटेलमध्ये त्यांनी पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी आमदार, मंत्र्यांना मार्गदर्शन केले. बैठकीला मंत्री बाबूश मॉन्सेरात, आमदार जेनिफर मॉन्सेरात, आमदार गोविंद गावडे अनुपस्थित होते.
युवा मोर्चात उत्साहाचे वातावरण : मुख्यमंत्री
नितीन नबीन हे पूर्वी युवा मोर्चाचे कार्यकर्ते होते. युवा मोर्चाचा कार्यकर्ता अध्यक्ष झाल्याने युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. २०२७ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. येत्या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू करण्याचा सल्ला पक्षाध्यक्षांनी दिला असून, संघटन अधिक मजबूत करण्यासह निवडणूक रणनितीबाबत आमदारांना मार्गदर्शन करण्यात आल्याचे त्यांनी बैठकीनंतर सांगितले. प्रत्येक आमदाराचा कार्यकर्त्यांशी तसेच सामान्य नागरिकांशी थेट संपर्क असणे आवश्यक आहे. शिस्तबद्ध आणि समर्पित भावनेने लोकांची सेवा करण्याचा संदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला.
संघटितपणे काम केल्यास विजय निश्चित : दिगंबर कामत
आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी संघटितपणे काम करावे, असा संदेश नूतन अध्यक्ष नितीन नबीन यांनी दिला आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. एकजुटीने काम केल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत विजय निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील राजकीय परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न : आलेक्स सिक्वेरा
भाजपाध्यक्ष नितीन नबीन हे अनुभवी राजकारणी असून, गोव्यातील राजकीय परिस्थिती आणि सध्याची स्थिती जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे आमदार अालेक्स सिक्वेरा यांनी सांगितले. येत्या निवडणुकीसंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केल्याचेही सिक्वेरा यांनी नमूद केले.
आज ताळगावात कार्यकर्त्यांना संबोधन
पणजीत बैठक घेतल्यानंतर नितीन नबीन यांनी वेर्णा येथील श्री महालसा मंदिराला भेट दिली. नितीन नबीन शनिवारी ताळगाव येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास संबोधित करणार आहेत. गोव्यातील हे त्यांचे पहिलेच जाहीर भाषण असून, विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचे गोव्यात आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज नितीन नबीन यांची सभा होत असून, गोव्यातील त्यांच्या पहिल्याच भाषणामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
मगो, अपक्ष आमदारांसोबत बैठक
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सरकारला पाठिंबा देणारे मगोचे आमदार, मंत्री सुदिन ढवळीकर, तसेच अपक्ष आमदारांसोबत बैठक घेतली. सरकारच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.