संदीप चोडणेकरांकडे पीडब्ल्यूडीच्या प्रधान मुख्य अभियंत्याचा अतिरिक्त ताबा

कार्मिक खात्याकडून आदेश जारी


2 hours ago
संदीप चोडणेकरांकडे पीडब्ल्यूडीच्या प्रधान मुख्य अभियंत्याचा अतिरिक्त ताबा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : उत्तम पार्सेकर यांच्या मुदतवाढीचा कालावधी संपल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) प्रधान मुख्य अभियंतापदाचा अतिरिक्त ताबा मुख्य अभियंते संदीप चोडणेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. १ फेब्रुवारी २०२६ पासून त्यांच्याकडे प्रधान मुख्य अभियंतापदाचा अतिरिक्त ताबा राहील. या विषयीचा आदेश कार्मिक खात्याने जारी केला आहे.
मागील बरीच वर्षे उत्तम पार्सेकर पीडब्ल्यूडीचे प्रधान मुख्य अभियंते आहेत. निवृत्तीनंतर त्यांना लगेच मुदतवाढ दिली जात होती. मागील वेळेला दिलेल्या एक वर्षाच्या मुदतवाढीचा कालावधी ३१ जानेवारीला संपत आहे. या पार्श्वभूमीवर प्रधान मुख्य अभियंतापदाचा अतिरिक्त ताबा संदीप चोडणेकर यांच्याकडे देण्याचा आदेश जारी झाला आहे.
उत्तम पार्सेकर यांच्या मुदतवाढीला न्यायालयात आव्हान दिले होते. यापूर्वीही त्यांच्या मुदतवाढीला हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता धुसर झाली होती. संदीप चोडणेकर यांनी पीडब्ल्यूडी खात्यात विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.