फातोर्डा पोलिसांकडून चार संशयितांना अटक

खुनाच्या घटनेनंतर घोगळ मशिदीबाहेर झालेली गर्दी.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : घोगळ हाउसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीच्या बाहेर नमाजानंतर अली कलंदर खान (४०) यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. मशिदीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर येत आहे.
घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशीद आणि मदरसा येथे नमाजासाठी गेले असताना अली कलंदर खान यांच्यावर खुनी हल्ला झाला. नमाजानंतर खान यांच्यासोबत मशिदीतच संशयितांनी वाद घालण्यास सुरुवात केली. मशिदीबाहेर आल्यानंतर चाकूने हल्ला करण्यात आला. यात अली खान यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा इस्पितळाच्या परिसरात मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते.
मशिदीच्या मुद्द्यावरून काही दिवसांपासून वाद निर्माण झाला होता. महबूब मकानदार व शबिर खान यांच्यासह काही जणांकडून मशिदीच्या कामकाजात अडथळा निर्माण केला जात असून बेकायदेशीर निधी गोळा केला जात असल्याची तक्रार शुक्रवारी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती. याच वादातून चाकूहल्ल्याचा प्रकार घडला.
अली खान यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अधीक्षक टिकससिंग वर्मा व सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ या प्रकरणात सहभागी अक्रम खान (४५) व उबेद मकानदार (३८) यांना ताब्यात घेऊन अटक केली. सायंकाळी उशिरा संशयित आलम सय्यद व लतिफ सय्यद यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले व नंतर त्यांना अटक केली. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
चौकशीत नावे येणार्यांना अटक होणार : अधीक्षक
पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी सांगितले की, घोगळ येथील चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. दोघा संशयितांना अटक केली असून आणखी काही जणांना ताब्यात घेतले आहे. खूनासाठी वापरलेले हत्यार जप्त केले आहे.चौकशी नावे समोर येतील त्यांना अटक केली जाईल. इतर ठिकाणी तैनात असल्यामुळे घटनास्थळी पोलीस कमी होते. सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
सहभागींच्या अटकेशिवाय मृतदेह घेणार नाही
हल्ला पूर्वनियोजित असून गुरुवारी रात्री बैठकीत ठरवून हा प्रकार झाला आहे. पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. प्रकरणात सहभागी सुमारे १५ जणांना अटक झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, असे अली खान यांच्या कुटुंबियांसह स्थानिकांनी सांगितले.