काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचे आवाहन

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवणे आवश्यक आहे. उमेदवारीसाठी इच्छुक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढे येऊन पक्षाशी संपर्क साधावा. नगरपालिका निवडणुकीत चांगले काम करून दाखवणाऱ्यांना संधी दिली जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. शुक्रवारी पणजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वीरेंद्र शिरोडकर आणि सावियो डिसिल्वा उपस्थित होते.
पाटकर पुढे म्हणाले, काँग्रेसवर उमेदवार यादी उशिरा जाहीर केल्याचा आरोप वरचेवर हाेतो. ते टाळण्यासाठीच आम्ही आतापासूनच इच्छुकांना संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. काही कारणास्तव पक्ष सोडलेल्यांनाही संधी देत आहोत. सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. असे असले तरी पक्षांतर केलेल्यांना पुन्हा संधी देणार नाही. नुकत्याच पक्षश्रेष्ठींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत समाविचारी पक्षांसोबत युती करण्यास आम्ही तयार आहोत. याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. पक्षाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचेच उमेदवार असतील. पक्षांतर केलेल्या उमेदवारांना मागच्या दाराने संधी देणाऱ्या पक्षांसोबत युती करणार नाही. मागील निवडणुकीत झालेल्या चुका होणार नाहीत, याची आम्ही खात्री देतो.
प्रदेश काँग्रेसचे विकेंद्रीकरण
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, प्रदेश काँग्रेसमध्ये प्रशासकीय स्तरावर बदल केले आहेत. यानुसार काँग्रेस संघटनेसाठी गोव्यात म्हादई, उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती असे चार जिल्हे करून त्यांच्यात ४० मतदारसंघांची विभागणी केली आहे. प्रदेश काँग्रेसचे अधिकार आणि जबाबदारी यांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार करणार
पाटकर म्हणाले की, सरकारने युनिटी मॉलविरोधात आंदोलन करणाऱ्या मूळ गोमंतकीयांना पणजीत सभा घेऊ दिली नाही. मात्र त्याच दिवशी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे जंगी स्वागत केले. यावेळी झालेल्या नियमभंगाबाबत आम्ही तक्रार दाखल करणार आहोत.