मध्यप्रदेशमध्ये गोवा पोलिसांच्या पथकावर हल्ला : संशयित हिरासिंगला दहा दिवसांची पोलीस कोठडी

संशयित हिरासिंग याला न्यायालयात नेताना पर्वरी पोलीस. (उमेश झर्मेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : बार्देशमधील सुकूर-पर्वरी आणि पेडे-म्हापसा येथील घरफोडीत ४१ लाखांचा ऐवज लुटण्यात आला होता. या प्रकरणी अलीराजपूर (मध्यप्रदेश) येथील कुख्यात टोळीचा म्होरक्या हिरासिंग डोंगरसिंग बामनिया (३८, रा. माल फलिया, बाहाडिया) याला पर्वरी पोलिसांनी अटक केली. संशयिताला सोडविण्यासाठी त्याच्या साथीदारांनी गोवा पोलीस पथकाच्या गाडीवर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात उपनिरीक्षकासह दोघे पोलीस किरकोळ जखमी झाले. वाहनाचे मोठे नुकसान झाले.
घरफोडीच्या घटना २३ जानेवारी रोजी पहाटे घडल्या होत्या. सुकूरमधील ‘देवश्री ग्रीन’ इमारतीतील किरण म्हांबरे यांचा फ्लॅट फोडून दीड लाखांच्या रोख रकमेसह १५ सोन्याचे दागिने, नाणी मिळून ६ लाखांचा मुद्देमाल लंपास झाला होता. घटनेच्यावेळी म्हांबरे कुटुंब मुंबईला गेले होते. पेडे म्हापसा येथील ‘प्रुडेन्शियल पाल्म’ इमारतीतील वैभव गावडे व वैदिक श्रीवास्तव यांचे दोन फ्लॅट फोडले होते. गावडे यांच्या फ्लॅटमधून १२ लाखांचे दागिने आणि श्रीवास्तव यांच्या फ्लॅटमधून २३ लाखांचे सुवर्णालंकार चोरण्यात आले होते. घटनेच्यावेळी गावडे कुटुंब बाहेरगावी, तर वैदिक श्रीवास्तव वास्कोतील बिट्स पिलानीमध्ये होता.
चोरी झाल्याचे उघडकीस येताच पर्वरी व म्हापसा पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. पोलिसांच्या चौकशीतून चोरीमध्ये मध्यप्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यातील टोळीचा समावेश दिसून आला. पर्वरीचे उपनिरीक्षक सीताराम मळीक, कॉन्स्टेबल भिकाजी परब आणि म्हापसाचे उपनिरीक्षक बाबलो परब, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील व पुंडलिक आरोसकर यांचे पथक मध्यप्रदेशात पाठवण्यात आले. पथकाने अलीराजपूरचे पोलीस अधीक्षक आणि बोरी पोलीस स्थानकाशी समन्वय साधला. गुरुवारी पहाटे बोरी पोलिसांच्या मदतीने पथकाने बाहाडिया येथे छापा टाकला. संशयित हिरासिंगला चाहुल लागताच त्याने जंगलात धूम ठोकली. पथकाने सुमारे १ किलोमीटर पाठलाग करून संशयिताच्या मुसक्या आवळल्या. नंतर अटकेची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.

संशयिताला गोव्यात आणण्यासाठी बोरीहून सुमारे २० किलोमीटरवर जोबट प्रथमश्रेणी न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी नेले जात होते. त्यावेळी गोवा व स्थानिक पोलिसांच्या वाहनांवर संशयिताच्या १५ ते २० दुचाकीस्वार साथीदारांनी हल्ला चढवला. हल्लेखारांनी दगडफेकीसह कोयता आणि दंडुकांचा वापर केला. वाहन अडवून संशयिताला पळवण्याचा हल्लेखोरांचा प्रयत्न मात्र पोलिसांनी धैर्याने प्रत्युत्तर दिल्याने यशस्वी होऊ शकला नाही. हल्ल्यात गोवा पोलिसांना किरकोळ दुखापत झाली. स्थानिक पोलिसांची अतिरिक्त कुमक आल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
दरम्यान, गोवा पोलीस पथक शुक्रवारी दुपारी विमानमार्गे संशयिताला घेऊन गोव्यात दाखल झाले. पर्वरी पोलिसांनी संशयित हिरासिंगला रितसर अटक केली. संशयिताला म्हापसा न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
गोवा पोलिसांकडून मध्यप्रदेश पोलिसांचे आभार
सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांनी सुरक्षा पुरवली. यामुळे गोवा पोलिसांची सुरक्षा सुनिश्चित झाली. तत्काळ मदत आणि सहकार्याबद्दल गोवा पोलिसांनी मध्यप्रदेश पोलिसांचे आभार मानले. गोवा पोलिसांनी दाखवलेल्या शौर्याचे कौतुक केले.
टोळीकडून देशातील विविध भागांत घरफोडी
घरफोडी करणारी बाहाडिया गावातील चार जणांची टोळी आहे. टोळीचा हिरासिंग म्होरक्या आहे. टोळीने देशातील विविध भागांत घरफोडी करून रोख रक्कम आणि सुवर्णालंकार लंपास केले आहेत. संशयिताविरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत. ही टोळी गोव्यात रेल्वेमार्गे आली होती व चोरी करून रेल्वेमार्गेच मूळ गावी परतली होती.