करचुकवेगिरी : दस्तावेज तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त

पणजी : जमिनीवरील कॅसिनोंमध्ये परवाना नसतानाही लाईव्ह गेमिंग चालत असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर जीएसटी इंटेलिजेन्स महासंचालनालयाने (डीजीजीआय) कदंब पठारावरील कॅडिलॅक डायमंड या कॅसिनोवर छापा टाकला. या कारवाईत अनेक दस्तावेज जप्त करण्यात आले असून करचुकवेगिरीच्या प्रकरणात या कॅसिनोचे व्यवहार आता जीएसटी गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर आले आहेत.
करचुकवेगिरी करून मोठ्या प्रमाणात जीएसटी बुडवला जात असल्याची खात्री झाल्यानंतर डीजीजीआयने ही कारवाई केली. मंगळवारी कदंब पठारावरील हॉटेल डबल ट्री हिल्टनमधील कॅडिलॅक डायमंड कॅसिनोवर छापा टाकून अनेक प्रकारचे दस्तावेज, इलेक्ट्रॉनिक यंत्रे जप्त करण्यात आली. या कॅसिनोच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी आस्थापनाच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आले असून यामुळे कॅसिनो उद्योगात खळबळ उडाली आहे.
परवाने नसताना ऑनलाईन गेमिंग आणि जमिनीवरील कॅसिनोंत लाईव्ह गेमिंग करून सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्याचे प्रकार सुरू आहेत. गोव्यात जमिनीवर असलेल्या अनेक कॅसिनोंमध्ये सध्या लाईव्ह गेमिंग जोरात सुरू आहे. वास्तविक, फक्त तरंगत्या कॅसिनोंवर लाईव्ह गेमिंगला परवानगी असतानाही, जमिनीवरील कॅसिनोंत बेकायदा पद्धतीने हा जुगार सुरू आहे. राज्य सरकारच्या यंत्रणांच्या दुर्लक्षानंतर अखेर डीजीजीआयने ही कारवाई केली आहे.
कॅडिलॅक कॅसिनोकडून मोठ्या प्रमाणात जीएसटी नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीजीजीआयने ही कारवाई केली. या छाप्यात दस्तावेज, कॉम्प्युटर हार्ड डिस्क तसेच काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. सुमारे दहा तास चाललेल्या या छाप्यानंतर कॅसिनो आस्थापनाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यापूर्वी २०२३ मध्ये सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) या कॅसिनोवर छापा टाकून आर्थिक व्यवहारांची चौकशी केली होती, हे विशेष.