जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात ३३ प्रश्नांचा समावेश

ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा : १६ एप्रिलपासून प्रक्रियेला सुरुवात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th January, 10:31 pm
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात ३३ प्रश्नांचा समावेश

पणजी : जनगणना २०२७ साठीच्या पहिल्या टप्प्यात ३३ पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. याबाबत केंद्रीय गृह खात्याने परिपत्रक जारी केले आहे. राज्यात गृह जनगणनेचा पहिला टप्पा १६ एप्रिल ते १५ मे २०२६ दरम्यान पार पडणार आहे. यामध्ये मूलभूत माहितीसह आधुनिक सुखसुविधा आणि उपकरणांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेतली जाईल.

परिपत्रकानुसार, जनगणना अधिकारी नागरिक राहत असलेल्या इमारतीचा नगरपालिका किंवा अन्य शासकीय संस्थेने दिलेला क्रमांक, घरात फरशी, भिंत, छतासाठी वापरण्यात आलेले साहित्य, घराची स्थिती, घराचा वापर, मालकी हक्क, खोल्यांची संख्या, घरात राहणाऱ्यांची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग, जात, जोडप्यांची संख्या, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत, शौचालय प्रकार आणि सांडपाणी व्यवस्था याबाबत माहिती घेतील.

साधनसामग्री आणि उपकरणांची होणार नोंद

याव्यतिरिक्त आंघोळीची सोय, स्वयंपाकघर, एलपीजी जोडणी तसेच जेवणासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन आदी माहिती अधिकारी घेतील. तसेच रेडिओ, ट्रान्झिस्टर, टीव्ही, इंटरनेट सेवा, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टेलिफोन, मोबाईल फोन किंवा स्मार्ट फोन यांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न विचारले जातील. याशिवाय संबंधित कुटुंबाकडे सायकल, स्कूटर, मोटार सायकल, मोपेड, कार, जीप, व्हॅन आहेत का, याचीही नोंद घेतली जाणार आहे.

महत्त्वाची आकडेवारी आणि वेळापत्रक

तपशील माहिती
एकूण प्रश्नांची संख्या ३३
पहिला टप्पा (कालावधी) १६ एप्रिल ते १५ मे २०२६
उपलब्ध भाषा कोकणी, मराठी आणि इंग्रजी

सेल्फ एन्युमरेशन पोर्टल

यंदाच्या जनगणनेत प्रथमच ऑनलाईन पद्धतीने माहिती भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानुसार जनगणनेच्या ‘सेल्फ एन्युमरेशन पोर्टल’वर जाऊन वरील प्रश्नांची उत्तरे भरता येतील. नागरिकांना या पोर्टलवर आपला मोबाईल नंबर देऊन माहिती भरावी लागेल. यानंतर त्यांना ‘एसई आयडी’ (SEID) क्रमांक मिळेल. जनगणनेसाठी अधिकारी घरी आल्यावर त्यांना केवळ हा आयडी क्रमांक दाखवावा लागेल.

#Census2027 #GoaCensus #HomeMinistry #DigitalCensus #GoaNews #SelfEnumeration
हेही वाचा