सहा गाड्यांकडून पाण्याचा मारा : पाच तासांनी आग आटोक्यात

मडगाव : दवर्ली येथील श्री गौलक्ष्मी सॉ मिलमध्ये शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली. मडगावसह वेर्णा, कुंकळ्ळी, फोंडा, कुडचडे, पणजी येथील गाड्यांद्वारे पाणी मारून सहा तासांनी आगीवर नियंत्रण आणण्यात आले. यात ५० लाखांचे नुकसान झाले असून आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे. मात्र, सॉ मिलमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजना नसल्याचे स्पष्ट झाले.
मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गिल सुझा यांनी सांगितले की, मडगाव अग्निशामक दलाला इंडोना दवर्ली येथील श्री गौलक्ष्मी सॉ मिलमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. तत्काळ गाडी घटनास्थळी पाठवण्यात आली. सॉ मिलच्या एका बाजूला मशिनरी व लाकडांचा साठा करुन ठेवण्यात आला होता, ज्यावर मॉल्डींग, बीम करणे अशी प्रक्रिया केली जात असे. सकाळच्यावेळी त्याठिकाणी काम चालते. रात्री कुणीही त्याठिकाणी नसताना आग लागण्याची घटना घडली. या शेडच्या बाजूलाच कामगारांची घरे आहेत.
सॉ मिलची आग लागलेली शेड रात्री बंद होती. कामगारांना आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी मालकांना सांगितले. त्यानंतर पटेल यांनी अग्निशामक दलाला आगीची माहिती दिली. आगीत मशिनरीसह लाकडे जळून खाक झाली. किती नुकसान झाले याची माहिती सॉ मिल मालकांनी दिलेली नाही.
सॉ मिलला अग्निसुरक्षा नाही!
सॉ मिल बंद असल्याने ही आग कशी लागली याचा अंदाज नाही. सुरक्षारक्षकाचे वडील आजारी असल्याने तो रात्री नव्हता, असे कमलेश पटेल यांनी सांगितले. तसेच आगीपासून सुरक्षिततेसाठी काही उपाययोजना केल्या आहेत का अशी विचारणा केली असता, तसे काहीच नाही. यापूर्वी आग लागण्याची घटना घडली नव्हती असे सांगण्यात आले.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
सॉ मिलचे मालक कमलेश पटेल यांनी सांगितले की, रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. कामगारांनी अडीच वाजण्याच्या सुमारास माहिती दिली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्येही काही कळून येत नाही, पोलिसांनाही फुटेज दाखवले आहे. मशिनरी, शेड व इतर साहित्य आगीत जळाल्याने सुमारे ५० लाखांची हानी झाली.
सुमारे दहा गाड्या भरुन पाण्याचा मारा
आगीची भयानकता पाहून तत्काळ इतर अग्निशामक दलाकडून मदत मागण्यात आली. त्यानुसार वेर्णा, कुंकळ्ळी, कुडचडे, फोंडा व मुख्य कार्यालय पणजी येथून गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. या सहा ठिकाणच्या गाड्यांतून दोनवेळा पाणी भरुन मारा करण्यात आला. सुमारे दहा गाड्या पाणी आग विझवण्यासाठी वापरण्यात आल्या.