भीषण! ट्रकखाली झोपणे पडले महागात; चाकाखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू

संशयित चालकाला कर्नाटक पोलिसांकडून अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
भीषण! ट्रकखाली झोपणे पडले महागात; चाकाखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू

म्हापसा: करासवाडा येथील औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी रात्री अंगावर शहारे आणणारी घटना घडली. उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकखाली झोपलेल्या एका अज्ञात इसमाचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहनासह पसार झालेल्या चालकाला म्हापसा पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती अंदाजे ५० ते ६० वयोगटातील असून ती बेवारस असल्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून हा इसम औद्योगिक वसाहतीमधील 'जिनो फार्मास्युटिकल्स' कंपनीजवळील मुख्य रस्त्याच्या कडेला वास्तव्य करत होता. शुक्रवारी रात्री ११:३० च्या सुमारास रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका अवजड ट्रकखाली तो झोपला होता. दरम्यान, संशयित चालकाने ट्रक सुरू करताना खाली कोणी झोपले आहे, याचा अंदाज न आल्याने गाडी पुढे नेली. या प्रक्रियेत तो इसम ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला आणि गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच अंत झाला.

अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन म्हापसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठवून दिला. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि शेजारील महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांना सतर्क केले. तोपर्यंत संशयित ट्रक सावंतवाडी ओलांडून पुढे गेला होता.

शनिवारी दुपारी कर्नाटक मधील सुपा पोलिसांनी या अपघातास कारणीभूत ट्रकचा शोध लावून संशयित चालकाला ताब्यात घेतले. या अटकेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांचे एक पथक संशयित चालकाचा ताबा घेण्यासाठी कर्नाटकाकडे रवाना झाले आहे. 

हेही वाचा