पोलीस अधीक्षकांकडून चौकशीचे आश्वासन

मडगाव : घोगळ हाउसिंग बोर्ड येथील अली खान खून प्रकरणातील तक्रारदारांना संशयिताकडून धमकीचे संदेश आले आहेत. संशयित पोलीस कोठडीत असताना त्याच्या मोबाईलवरून धमकीचे संदेश कसे येतात? अशी विचारणा करत तक्रारदारांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टीकमसिंग वर्मा यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
घोगळ हाउसिंग बोर्ड येथील खून प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. असे असतानाही, या प्रकरणातील तक्रारदार आणि साक्षीदारांना धमकावण्याचे प्रकार सुरूच आहेत. तक्रारदारांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी खूनाची घटना घडल्यानंतर सायंकाळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता, तिथे उपस्थित संशयितांनी पुढचा नंबर तुमचा असेल, अशी धमकी पोलिसांसमोरच दिली होती. त्यावेळीही पोलिसांना याबाबत कल्पना देण्यात आली होती.
यानंतर संशयितांना अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. मात्र, शनिवारी सकाळी ७:५७ वाजता संशयिताच्या मोबाईल क्रमांकावरून तक्रारदार आणि साक्षीदारांना धमकीचा संदेश आला. माझ्या साथीदारांना काही त्रास दिल्यास मी जास्त काळ कोठडीत राहणार नाही; बाहेर पडल्यावर तुम्हा सर्वांना बघून घेईन, असा मजकूर या संदेशात होता. या संदेशाचा 'स्क्रीनशॉट' घेऊन तक्रारदारांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावर अधीक्षकांनी सांगितले की, ही घटना घडली तेव्हा जे कुणी ड्यूटीवर होते त्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाईल आणि उर्वरित संशयितांना पुढील ४८ तासांत अटक केली जाईल.
मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी
मारेकऱ्यांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका अली खान यांच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी घेतली होती. मात्र, पोलिसांनी समजून सांगितल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली आहे; तरीही अंत्यसंस्कारांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
धमकीप्रकरणी कारवाई करणार
पोलीस अधीक्षक या खून प्रकरणात ज्यांची नावे समोर येत आहेत, त्या सर्वांवर अटकेची कारवाई केली जाईल. आतापर्यंत चार जणांना अटक केली असून आणखी काही संशयितांची ओळख पटली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल. धमकीच्या संदेशाबाबत तक्रार प्राप्त झाली असून, तांत्रिक तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल. हा संपूर्ण प्रकार मशिदीच्या अंतर्गत वादातून घडला असून, यात अनेक जण सहभागी आहेत. त्यामुळेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मशीद परिसर सील करण्याची मागणी करण्यात आली होती, अशी माहिती अधीक्षक टीकमसिंग वर्मा यांनी दिली. दरम्यान, फातोर्डा पोलिसांनी आणखी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.