मडगाव : घोगळ हाउसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशीद सील; परिसरात तणावपूर्ण शांतता

अंतर्गत वादातून घडली होती खुनाची घटना.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
55 mins ago
मडगाव : घोगळ हाउसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशीद सील; परिसरात तणावपूर्ण शांतता

मडगाव : घोगळ हाउसिंग बोर्ड परिसरातील सुन्नी गुलिस्तान मशीद दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांच्या उपस्थितीत सील करण्यात आली. मशिदीबाहेर खुनाची घटना घडली असून तिचा तपास सुरू असल्याने, शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मशीद दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे.





हेही वाचा : 

मशिदीच्या वादातून घोगळ येथे चाकूहल्ल्यात एकाचा 

घोगळ हाउसिंग बोर्ड येथे सुन्नी गुलिस्तान मशिदीबाहेर अली खान याच्यावर चाकू हल्ला झाला, त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शांतता राखण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने ही मशीद पुढील ४८ तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस प्रशासनाने ३० जानेवारी रोजी सादर केलेल्या अहवालानंतर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला. परिस्थिती पाहता, सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत कोणालाही मशीद परिसरात प्रवेश करण्यास मनाई असेल. केवळ फातोर्डा पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीनेच प्रवेश दिला जाईल. दोन दिवसांनंतर स्थानिक पोलिसांच्या अहवालाच्या आधारे परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.




परिसरात चोख बंदोबस्त मशिदीचे उपाध्यक्ष अली खान यांच्यावर नमाजानंतर चाकू हल्ला झाला, ज्यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात अद्याप तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, मशीद परिसर व रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

चारजणांना अटक, आणखी काहीजण रडारवर 

मशिदीचे उपाध्यक्ष अली कलंदर खान (वय ४०) यांच्या खून प्रकरणी दक्षिण गोवा पोलिसांनी तत्काळ अक्रम खान (४५) व उबेद मकानदार (३८) या दोघांना अटक केली. त्यानंतर सायंकाळी संशयित आलम सय्यद व लतिफ सय्यद यांनाही ताब्यात घेण्यात आले. जिल्हा रुग्णालयातही एका संशयितावर जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलीस व सुरक्षारक्षकांनी त्याला वाचवले. या प्रकरणी आणखी काहीजणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, लवकरच त्यांनाही अटक केली जाण्याची शक्यता आहे.


हेही वाचा