‘अजितदादा पवार अमर रहे’, अंत्ययात्रेसाठी बारामतीत लोटला जनसागर!

अमित शहा यांच्यासहीत अनेक नेत्यांची उपस्थिती : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
‘अजितदादा पवार अमर रहे’, अंत्ययात्रेसाठी बारामतीत लोटला जनसागर!

बारामती (Baramati) : महाराष्ट्राचे (Maharashtra) उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित (दादा) पवार (Ajit Pawar)  यांनी काल बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अखेरचा निरोप घेतला. बारामती येथे आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी अंत्ययात्रेला जनसागर लोटला आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्यासहीत देशभरातील अनेक राजकीय क्षेत्रातील नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर बारामतीत दाखल झाले आहेत. ‘अजितदादा अमर रहे’ या घोषणांनी परिसर भरून गेला. 

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिव देहाची 'अंतिम यात्रा' आज सकाळी त्यांच्या प्रतिमेसह आणि "स्वर्गीय अजितदादा पवार अमर रहे" असा संदेश लिहिलेल्या फुलांनी सजवलेल्या रथामधून काढण्यात आली.  तिरंग्यात गुंडाळलेले अजित पवार यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणण्यात आले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराचे विधी सुरू झाले आहेत.  अंत्ययात्रा सकाळी ९ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या आवारातून (गडीमा) सुरू झाली.  लोकांना श्रद्धांजली वाहता यावी यासाठी बारामती शहरातून गेली. नंतर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणण्यात आली. 

अजितदादा पवार यांचे काल बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाल्याची माहिती मिळाल्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांसहीत इतर राजकीय पक्षांचे नेते, त्यांचे चाहते यांनी एकच गर्दी केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा माजी केंद्रीयमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहीत देशभरातील विविध राजकीय पक्षांचे नेते अंत्यसंस्कारात सहभागी झाले आहेत. यापूर्वीच तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.  राजकीय नेते ते सामान्य कार्यकर्त्यांच्या ओठात शब्द आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणात तळपणारे, झपाट्याने कार्यरत असणारे, मनी तेच ओठी असे राजकारणातील ‘दादा’, दिलदार माणूस सोडून गेले. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना अनेकांच्या अश्रूंचा बांध फूटला. त्यात नेते ते सामान्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. आणि ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणा बारामतीच्या मातीत घुमत आहेत.   

इतरांचे मृतदेह दिले कुटुंबियांच्या ताब्यात 

दरम्यान, बारामती विमान अपघातात मृत्यू झालेल्या पायलट कॅप्टन सुमित कपूर, सह-पायलट कॅप्टन शंभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचे शवविच्छेदन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.    

हेही वाचा