१ फेब्रुवारीपासून ६ मोठे बदल: नव्या करांमुळे तंबाखू-सिगारेटच्या दरात ४०% वाढ

मालमत्ता नोंदणीसाठी आधार सक्ती, तर कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
32 mins ago
१ फेब्रुवारीपासून ६ मोठे बदल: नव्या करांमुळे तंबाखू-सिगारेटच्या दरात ४०% वाढ

नवी दिल्ली: फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून देशात सहा मोठे आर्थिक आणि प्रशासकीय बदल लागू झाले असून, याचे थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहेत. नव्या नियमांनुसार सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, तर दुसरीकडे विमान इंधनाचे दर कमी झाल्यामुळे हवाई प्रवाशांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिगारेट आणि तंबाखू उत्पादने महागली 

आजपासून सिगारेट, पान मसाला, खैनी आणि गुटखा यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थांवर ४० टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी या उत्पादनांवर २८ टक्के जीएसटी आणि 'कंपन्सेशन सेस' लावला जात असे, ज्यामुळे एकूण कर ५० टक्क्यांच्या वर जात होता. आता सेस हटवून थेट ४० टक्के जीएसटी आणि सिगारेटच्या लांबीनुसार नवी एक्साईज ड्युटी लागू करण्यात आली आहे. एक्साईज ड्युटी उत्पादन खर्चात जोडली जाते आणि त्यावर जीएसटी आकारला जातो, ज्यामुळे 'करावर कर' बसून अंतिम किमतीत १५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सिगारेट-तंबाखू शौकींनांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. मात्र, सरकारने बिडीवरील जीएसटी १८ टक्क्यांवर ठेवून सर्वसामान्य बिडी कामगार आणि ग्राहकांना दिलासा दिला आहे.

फास्टॅग प्रक्रियेत सुलभता 

वाहनचालकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, आजपासून नवीन कार, जीप किंवा व्हॅनसाठी फास्टॅग घेताना 'नो युअर वेहिकल' (KYV) या पडताळणी प्रक्रियेची अट शिथिल करण्यात आली आहे. नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) ग्राहकांचा वेळ वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ज्या वाहनांवर आधीच फास्टॅग आहे, त्यांनाही आता नियमित पडताळणीची गरज उरणार नाही. ही प्रक्रिया आता केवळ 'गरज आधारित' करण्यात आली असून, तक्रार प्राप्त झाल्यास किंवा गैरवापर आढळल्यास संबंधित फास्टॅगची चौकशी केली जाईल.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ 

घरगुती अर्थसंकल्पावर परिणाम करणारा आणखी एक बदल म्हणजे १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत हा दर १७४०.५० रुपयांवर पोहोचला आहे, तर चेन्नईत तो १८९९.५० रुपयांपर्यंत गेला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांसाठी ही दरवाढ अडचणीची ठरू शकते, ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम बाहेर जेवणाऱ्या ग्राहकांवर होऊ शकतो.

बँकिंग आणि हवाई प्रवासात दिलासा 

भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) महत्त्वाची बैठक ४ ते ६ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. या बैठकीत रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात होऊन तो ५ टक्क्यांपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर ही कपात झाली, तर बँकांचे कर्ज स्वस्त होऊन सर्वसामान्यांच्या कर्जाचा हप्ता (EMI) कमी होऊ शकतो. हवाई प्रवाशांसाठी मात्र दिलासादायक बातमी आहे. तेल कंपन्यांनी विमान इंधनाचे (ATF) दर सुमारे १ हजार रुपयांनी कमी केले आहेत. इंधन स्वस्त झाल्यामुळे विमान कंपन्या आपल्या तिकीट दरात कपात करण्याची शक्यता असून, फेब्रुवारीत विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो.

मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी 'आधार' अनिवार्य 

उत्तर प्रदेश आणि कर्नाटक सरकारने १ फेब्रुवारीपासून मालमत्तेच्या नोंदणीसाठी 'आधार ऑथेंटिकेशन' अनिवार्य केले आहे. आता खरेदीदार, विक्रेता आणि साक्षीदार यांना सब-रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन बायोमेट्रिक किंवा फेस व्हेरिफिकेशन करावे लागेल. बेनामी मालमत्ता आणि फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी 'वन नेशन, वन रजिस्ट्रेशन' अंतर्गत हा नियम लवकरच देशभरात लागू होण्याची चिन्हे आहेत.

या सर्व बदलांमुळे फेब्रुवारी महिन्यात नागरिकांना एका बाजूला दरवाढीचा चटका सोसावा लागणार आहे, तर दुसरीकडे डिजिटल सुलभता आणि संभाव्य कर्ज कपातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याचीही आशा आहे.

हेही वाचा