साप्ताहिकी : अपघातांची मालिका सुरूच, युनिटी मॉलचे स्थलांतर, आगीच्या घटनांत लाखोंचे नुकसान

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
2 hours ago
साप्ताहिकी : अपघातांची मालिका सुरूच, युनिटी मॉलचे स्थलांतर, आगीच्या घटनांत लाखोंचे नुकसान

पणजी : जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा गोव्यासाठी अत्यंत घटनाबहुल ठरला. एकीकडे चिंबल येथील युनिटी मॉल विरोधातील आंदोलनाला यश आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला, तर दुसरीकडे संपूर्ण आठवडाभर भीषण रस्ते अपघात, खून आणि आगींच्या घटनांनी राज्य हादरले. अमली पदार्थ जप्ती, जीएसटीचे छापे आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमुळे पोलीस यंत्रणाही व्यस्त राहिलेली पाहायला मिळाली.
.....
रविवार
हणजूणमध्ये स्वयंअपघातात कार चालक ठार
हणजूण येथील रॉकी गॅरेजजवळ भरधाव कारने माडाला धडक दिली. या स्वयंअपघातात जस्टर रॉड्रिग्ज (२७, केपे) हा कारचालक युवक ठार झाला. जस्टर हा कारने हडफडेहून हणजूणच्या दिशेने जात होता. कार हणजूण येथील रॉकी गॅरेजजवळ पोहोचताच कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व कारची रस्त्याच्या कडेच्या माडाला धडक बसली.
....
सिमेंटचा खांब अंगावर पडून जखमी युवकाचा मृत्यू
कुडतरी गोगाळी याठिकाणी काम करत असताना सिमेंटचा खांब अंगावर पडल्याने गौरव कुमार (रा. भागलपूर, बिहार) हा २० वर्षीय युवक जखमी झाला. गोमेकॉत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
.......
डिचोली लाखेरी येथे अपघात : दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
डिचोली तालुक्यातील लाखेरी येथे रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. डिचोलीच्या दिशेने दुचाकीने येणाऱ्या गणेश बिरादर (वय ३०, रा. कृष्णा नगर, डिचोली) याचा या अपघातात मृत्यू झाला. कंटेनरची धडक बसल्याने हा अपघात झाला असून कंटेनर चालक फरार झाला आहे.
....
मच्छिमारांच्या जाळ्यांना आग लागून १२ लाखांचे नुकसान
भौतेर-वाडे किनाऱ्यावरील मच्छिमारांच्या जाळ्यांना आग लागल्याने तीन मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रापण, जाळी व इतर वस्तू जळाल्याने सुमारे बारा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे संबंधित मच्छिमारांनी सांगितले. या मच्छिमारी जाळ्यांना आग लागण्यामागे घातपात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
........
सोमवार 



पोलिसांनी चिंबल ग्रामस्थांना रोखले
युनिटी मॉल विरोधात आंदोलन करणाऱ्या चिंबल ग्रामस्थाना पोलिसांनी विद्यापीठ मैदानावर जाण्यापासून रोखले. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात निदर्शने करण्याच्या हेतूने चिंबल ग्रामस्थ आले होते.
.....
मोरजीमध्ये ४.७२ लाखांचा गांजा जप्त
मांद्रे पोलिसांनी मोरजी येथे धाड टाकून ४ लाख ७२ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी मोद्दिन तालेवेगार (३८, रा. हावेरी, कर्नाटक) याला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली असून त्याच्याकडून सुमारे पावणेपाच किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
....
अनमोड घाटात दुचाकीचा भीषण अपघात; युवकाचा मृत्यू
अनमोड घाट परिसरात दुचाकीचा भीषण अपघात होऊन जोयडा तालुक्यातील कुरवई येथील एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. सचिन सावर्डेकर असे मृताचे नाव असून, या अपघातात अमर ठाकूर (रा. सोनारवाडी) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.
....
अटल सेतूवर कारला आग
पर्वरी येथे अटल सेतूवर आग लागल्याने क्वीड ही चालती कारगाडी जळून खाक झाली.
......
मंगळवार 
५ लाखांचा गंडा घालणारा तोतया अधिकारी गजाआड


गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (जीएसपीसीबी) अधिकारी असल्याचे भासवून काणकोण येथील एका व्यावसायिकाची ५ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. सूरज हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गोव्यात ८, तर महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रत्येकी १ असे एकूण १० गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी गुन्हा अन्वेषण शाखेने सराईत गुन्हेगार सूरज पेंडसे (रा. आसगाव) याला पुण्यातून अटक केली.
.....
कंटेनरची झाडाला धडक बसून चालक जखमी
धारबांदोडा येथील पंचायत समोरील रस्त्यावर रविवारी रात्री कंटेनरची झाडाला बसून झालेल्या अपघातात मंजुनाथ (कर्नाटक) हा चालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर केबिनमध्ये अडकून पडलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी फोंडा अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना सुमारे दीड तास कसरत करावी लागली.
.....
गुंतवणूकदाराच्या फसवणूकप्रकरणी ‘आरजे’ कंपनीच्या संचालकाला अटक
राज्यातील सुमारे १६० गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून २.३७ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) आर. जे. पॅपिलाॅन निधी लि. कंपनीचा संचालक रमेश जोशी (ठाणे - मुंबई) याला अटक केली.
........


अंजुणे धरणाजवळील अपघातात युवतीचा मृत्यू, सहाजण जखमी
चोर्ला घाटात अंजुणे धरणाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका युवतीचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात देवदर्शन करून गोव्यात परत येताना हा अपघात घडला.
......
बुधवार 



युनिटी मॉल, प्रशासन स्तंभ प्रकल्प अखेर हलवले
चिंबल येथील युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ हे दोन्ही प्रकल्प अन्य ठिकाणी हलविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गावकऱ्यांच्या भावना आणि भावनिक बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे पर्यटन खात्याने बुधवारी रात्री जाहीर केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे.
......
भेसळयुक्त दारू तस्करीचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार शैलेश जाधव अटकेत
गुन्हा शाखेने एशियन पेंटच्या नावाखाली गोव्यातून बेळगावमध्ये होणार्‍या भेसळयुक्त दारू तस्करीचा ६ डिसेंबर २०२५ रोजी पर्दाफाश केला होता. त्यात सुमारे १ कोटी रुपयांची बनावट दारू जप्त केली होती. या प्रकरणी गुन्हा शाखेने सांगली - महाराष्ट्र येथून मुख्य सूत्रधार शैलेश जाधव याला अटक केली आहे.
......
पांझरखणी येथे कारच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू
पांझरखणी कुंकळ्ळी येथे भरधाव वेगाने येणार्‍या कारची धडक दुचाकीला बसली. यात जखमी दुचाकीचालक उल्हास गावकर (५५, रा. गावकरवाडा, पांझरखणी) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक संजय होराकेरी (रा. दवर्ली, मूळ कर्नाटक) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
.......
गुरुवार



कॅडिलॅक डायमंड कॅसिनोवर जीएसटीचे छापे
जमिनीवरील कॅसिनोंमध्ये परवाना नसतानाही लाईव्ह गेमिंग चालत असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर जीएसटी इंटेलिजेन्स महासंचालनालयाने (डीजीजीआय) कदंब पठारावरील कॅडिलॅक डायमंड या कॅसिनोवर छापा टाकला. या कारवाईत अनेक दस्तावेज जप्त करण्यात आले असून करचुकवेगिरीच्या प्रकरणात या कॅसिनोचे व्यवहार आता जीएसटी गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर आले आहेत.
.......
सालेली-सत्तरी येथील काजू बागायती आगीच्या भक्ष्यस्थानी
होंडा पंचायत क्षेत्रातील सालेली गावात सुक्या गवताला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात काजू बागायतीचे नुकसान झाले. अनेक काजू उत्पादकांना याचा फटका बसला असून, नुकसानीचा अंदाज लाखोंमध्ये असल्याचे वाळपई अग्निशामक दलाच्या सूत्रांनी सांगितले.
.......


रोशन रेडकरच्या पोलीस कोठडीत वाढ

साकवाडी-हडफडे येथील बर्च क्लब आग दुर्घटना प्रकरणातील संशयित आरोपी माजी सरपंच रोशन रेडकर याच्या पोलीस कोठडीत ६ दिवसांची वाढ करण्यात आली. तर, बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचा आदेश म्हापसा न्यायालयाने दिला.
............
शुक्रवार 



म्हापसा, पर्वरी घरफोडीतील टोळीच्या म्होरक्याला अटक
बार्देशमधील सुकूर-पर्वरी आणि पेडे-म्हापसा येथील घरफोडीत ४१ लाखांचा ऐवज लुटण्यात आला होता. या प्रकरणी अलीराजपूर (मध्यप्रदेश) येथील कुख्यात टोळीचा म्होरक्या हिरासिंग डोंगरसिंग बामनिया (३८, रा. माल फलिया, बाहाडिया) याला पर्वरी पोलिसांनी अटक केली.
..........
घोगळ येथे चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू
घोगळ हाउसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीच्या बाहेर नमाजानंतर अली कलंदर खान (४०) यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. मशिदीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर येत आहे.
..........


दवर्लीत सॉ मिलमध्ये आग, ५० लाखांचे नुकसान
दवर्ली येथील श्री गौलक्ष्मी सॉ मिलमध्ये शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली. मडगावसह वेर्णा, कुंकळ्ळी, फोंडा, कुडचडे, पणजी येथील गाड्यांद्वारे पाणी मारून सहा तासांनी आगीवर नियंत्रण आणण्यात आले. यात ५० लाखांचे नुकसान झाले असून आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे. मात्र, सॉ मिलमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजना नसल्याचे स्पष्ट झाले.
.......
शनिवार
ट्रकखाली चिरडून अज्ञाताचा मृत्यू
करासवाडा-म्हापसा येथील औद्योगिक वसाहतीत मालवाहू ट्रकखाली चिरडून एका अज्ञात इसमाचा मृत्यू झाला. मयत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ६० वर्षे आहे. अपघातानंतर वाहनासह पसार झालेल्या ट्रक चालकाला म्हापसा पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. ३०) रात्री ११.३० च्या सुमारास उघडकीस आला.

हेही वाचा