लईराई जत्रा : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

उच्चस्तरीय बैठक : सुरक्षा, उपायोजनांबाबत केल्या सूचना


31st January, 11:45 pm
लईराई जत्रा : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

शिरगाव जत्रेसाठी सुरक्षा व इतर बाबींचा आढावा घेताना जिल्हधिकारी अंकित यादव. सोबत इतर अधिकारी, देवस्थान समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ.
प्रतिनिधी। गाेवन वार्ता
डिचोली : शिरगाव येथे २१ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या श्री लईराई जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी उच्चस्तरीय समन्वय बैठक पार पडली. बैठकीत मागील वर्षी घडलेल्या घटनांमधून धडे घेत, जत्रा परिसरातील अरुंद रस्त्यांवर होणाऱ्या गर्दीच्या समस्या आणि संभाव्य धोके यावर चर्चा करण्यात आली. गर्दी नियंत्रण, सुरक्षितता उपाययोजना, पायाभूत सुविधा सज्जता, विविध खात्यांतील समन्वय यावर भर देण्यात आला.

या बैठकीला जिल्हाधिकारी अंकित यादव (आयएएस), पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण परब, उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. (आयपीएस), मामलेदार शैलेंद्र, देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गांवकर यांच्यासह पोलीस, जिल्हा प्रशासन, आरोग्य, अग्निशमन, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, पंचायत प्रतिनिधी, व्यवस्थापन समिती, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग व पंचायत संस्थांना रस्त्यांची दुरुस्ती, प्रकाश व्यवस्था, विद्युत सुरक्षा तपासणी आणि अनधिकृत बांधकामे हटविण्याची कामे जत्रेपूर्वी करण्याचे आदेश देण्यात आले. स्थानिक संस्थांच्या सहकार्याने वाहतूक व वाहनतळ व्यवस्थापन आराखडा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी मान्यताप्राप्त सुरक्षितता व गर्दी नियंत्रण आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. हजारो भाविकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्याचे ठरले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांसमवेत देवस्थान समितीच्या पदाधिकारी व ग्रामस्थांसोबत विविध भागाची पाहणी करून आढावा घेतला.
_ दीनानाथ गावकर, अध्यक्ष, श्री लईराई देवस्थान समिती
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
जत्रोत्सवाच्या दिवशी एकमार्गी (वन-वे) वाहतूक व्यवस्था राबविणे.
मुख्य मार्गांवरील अतिक्रमणे व दुकाने हटविणे.
परिसरात सीसीटीव्ही देखरेख व्यवस्था उभारणे.
संयुक्त नियंत्रण व आदेश कक्ष स्थापन करून थेट नियंत्रण ठेवणे.
वेळेच्या टप्प्यांनुसार भाविकांचा प्रवेश नियंत्रित करणे. यासाठी सार्वजनिक घोषणा प्रणालीचा वापर करणे.
संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविणे.
निर्दिष्ट थांबा क्षेत्रे निर्माण करणे.
वैद्यकीय मदत केंद्रे, रुग्णवाहिकांसाठी मोकळे मार्ग आणि २४ तास अग्निशमन सेवा उपलब्ध ठेवणे.

हेही वाचा