उद्यापासून ‘भारत रंग महोत्सव २०२६’ : पाच दिवस मराठी, हिंदी, तमिळ भाषांतील नाटके होणार सादर

पत्रकार परिषदेत माहिती देताना कला व संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक मिलिंद माटे. सोबत संजय मापारी, दत्ताराम चिमुलकर, अमोल बेतकीकर, रविराज च्यारी, स्नेहा देसाई, सातू माईणकर, दिनकर घाडी, जेस लुईस.
...
वार्ताहर। गोवन वार्ता
साखळी : केंद्रीय संस्कृती मंत्रालय, राष्ट्रीय नाट्य विद्यालय, गोवा राज्य कला व संस्कृती संचालनालय व रवींद्र भवन साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक भव्य आंतरराष्ट्रीय थिएटर महोत्सवानिमित्त ‘भारत रंग महोत्सव २०२६’ या जागतिक नाट्य महोत्सवाअंतर्गत गोव्यात प्रथमच साखळीतील रवींद्र भवन येथे पाच आंतरराष्ट्रीय दर्जाची नाटके सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती कला व संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक मिलिंद माटे, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे प्रतिनिधी संजय मापारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी साखळी रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, संचालक अमोल बेतकीकर, दिनकर घाडी, सातू माईणकर, स्नेहा देसाई, रविराज च्यारी, कार्यक्रम समन्वयक जेस लुईस आदी उपस्थित होते. यावर्षी २५ वा आंतरराष्ट्रीय थिएटर महोत्सव साजरा होत आहे. हल्लीच केंद्रीय राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे एक पथक साखळी येथील रवींद्र भवन येथे आले होते. रवींद्र भवनचा परिसर पाहिल्यानंतर यावर्षी आंतरराष्ट्रीय थिएटर महोत्सवाची पाच नाटके साखळीत सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. महोत्सवाचा उद्घाटन सोहळा २ फेब्रुवारी रोजी सायं. ७ वा. रवींद्र भवन येथे होणार आहे. सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला नाट्य रसिकांनी उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन दत्ताराम चिमुलकर यांनी केले.
महोत्सवात सादर होणारी नाटके
महोत्सवात २ फेब्रुवारी रोजी नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट संस्थेतर्फे संकेत पारेख लिखित व ऋत्विक व्यास दिग्दर्शित मराठी ‘अलाईव्ह’ नाटक सादर होईल. ३ फेब्रुवारीला फ्लोरियन झेलेर लिखित व दक्ष प्रदीप शिरोडकर दिग्दर्शित मांगिरीश युथ क्लब मंगेशी यांचे मराठी ‘फादर’ नाटक सादर होईल. ४ रोजी अवनीश मिश्रा लिखित व दिग्दर्शित रंगशिला थिएटर ग्रुप, मुंबई यांचे हिंदी ‘द मॉर्निंग शो’ नाटक होईल. ५ रोजी हॅप्पी रणजीत लिखित व दिग्दर्शित युनिकॉन अॅक्टर स्टुडिओ मुंबई यांचे हिंदी ‘ब्लडी बॉम्बे’ नाटक सादर होईल. ६ फेब्रुवारी रोजी धरीनी कोमल लिखित व दिग्दर्शित कोमल थिएटर चेन्नई संस्थेतर्फे तमिळ भाषेतील ‘द्रौपथी’ नाटक सादर होणार आहे. सर्व नाटके सायं. ७.३० वा. सुरू होणार आहेत.