चांदर येथील बैठकीत माजी न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांचे आवाहन

चांदर येथील कार्यक्रमात बोलताना माजी न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो आणि उपस्थित जनसमुदाय.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न असतील. लोकांनी गट निर्माण करून गावातील विकासाच्या गोष्टींवर चर्चा करावी. ज्या समस्या आहेत, बेकायदेशीर कामे होत आहेत, भू रूपांतरण व विक्री यावर चर्चा केल्यावर आपल्या आमदारांकडे जावे. गोव्यातील जागा संरक्षित करण्यासाठी करण्यात आलेल्या मागण्यांवर त्यांना विधानसभेत आवाज उठवण्याची मागणी करावी, असे आवाहन माजी न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी केले.
‘गावभावांचो एकवोट’तर्फे चांदर येथे इनफ इज इनफ ही बैठक घेण्यात आली. माकाझाना, पारोडा, सांगे, सां जुझे दी अरियाल ग्रामस्थ बैठकीला उपस्थित होते. यावेळी न्या. रिबेलो यांनी सांगितले की, अन्यायाबाबत, प्रशासनातील त्रुटींबाबत लोक आता बोलायला लागलेले आहेत. चळवळीतील ज्या लोकांवर गुन्हे नोंद होतील, त्यांच्यावरील खटले लढण्यात येतील असे वकिलांकडून सांगण्यात आलेले आहे. भ्रष्टाचार पूर्णपणे संपवणे शक्य होणार नाही पण लोकांच्या चळवळीतून या भ्रष्टाचारावर आळा आणणे शक्य आहे. या चळवळीची सुरुवात करण्यात आल्यापासून युवा वर्गाचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. प्रसारमाध्यमे व पत्रकार या चळवळीला साथ देत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. सर्वांच्या एकजुटीतून हा लढा पुढे नेण्यात येईल. महेश नाईक, इनिली डिसोझा, प्रदीप काकोडकर, हेमंत कांबळी फ्रेडी ट्राव्हासो यांनीही मत मांडले.
सरकारकडून प्रतिसाद नाही
जमिनींच्या रूपांतर व विक्रीसंदर्भातील कायद्यांबाबत राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यावर अद्यापही सरकारकडून उत्तर आलेले नाही. त्यावर न्यायालयातही लढा दिला जाईल. महात्मा गांधींच्या सत्याग्रह व शांततेच्या मार्गाने हा लढा लढला जाईल. ही चळवळ खूप काळ चालणार आहे. गावागावांतून समित्यांची निर्मिती केली जाईल. समितीतील लोक गावातील समस्या मांडतील व संघटना वाढवून चळवळ पुढे नेतील, असेही न्या. फेर्दिन रिबेलो यांनी सांगितले.