गोळीबारात कुणीही जखमी झालेला नाही

मुंबई : बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांच्या मुंबईतील (Mumbai) घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मध्यरात्रीनंतर रविवारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास जुहू (Juhu) परिसरातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पाच राऊंड फायरिंग करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिसर सुरक्षित केला असून तपास सुरू केला आहे.
घराबाहेर सुरक्षा वाढवली
पोलिसांच्या माहितीनुसार, या गोळीबारामागील नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. या हल्ल्याची जबाबदारीही अद्याप कुणी स्वीकारलेली नाही. घटनेनंतर रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जुहू परिसरात अनेक बॉलिवूड कलाकारांची घरे असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
तपासासाठी पोलिसांची अनेक पथके
गोळीबार प्रकरणाचा तपास करण्यासाठी अनेक पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. पोलीस कसून शोध घेत आहेत.
रोहित शेट्टी हे बॉलिवूडमधील अत्यंत यशस्वी दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते म्हणून ओळखले जातात.
यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींच्या घराबाहेर गोळीबार
रोहित शेट्टी यांच्यापूर्वीही अनेक नामवंत कलाकारांच्या घरांवर किंवा मालमत्तांवर गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.
कपिल शर्मा : कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅनडामधील ‘कॅप्स कॅफे’वर १० जुलै २०२५, ७ ऑगस्ट २०२५ आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये अशा तीन वेळा गोळीबार झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली होती.
दिशा पाटनी : १२ सप्टेंबर २०२५ रोजी अभिनेत्री दिशा पाटनी यांच्या बरेलीतील घराबाहेर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्याची जबाबदारीही बिश्नोई गँगने घेतली होती. नंतर दोन्ही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले.
सलमान खान : १४ एप्रिल २०२४ रोजी अभिनेता सलमान खान यांच्या मुंबईतील घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या प्रकरणाची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली होती. या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आली होती, ज्यांना नंतर जामीन मिळाला.
एपी ढिल्लों : प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लों यांच्या कॅनडास्थित घराबाहेर सप्टेंबर २०२४ मध्ये गोळीबार झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित रोहित गोडाराने स्वीकारली होती.
एल्विश यादव : १७ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे सुमारे ५ वाजता युट्यूबर एल्विश यादव यांच्या गुरुग्राममधील घरावर गोळीबार झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी कुणीही स्वीकारली नव्हती. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली होती.
रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे पुन्हा एकदा सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पोलीस यंत्रणा या घटनेचा सखोल तपास करत आहे.