'ही' असेल नवी ओळख; वाचा सविस्तर

डिचोली : आधुनिक काळानुसार आणि समतावादी विचारसरणीनुसार, जातीवाचक उल्लेख टाळण्याच्या उद्देशाने डिचोली नगरपालिकेने (Bicholim Muncipality) सरकारी (Government) नियमांनुसार पालिका हद्दीतील दोन वाड्यांची नावे बदलण्याचा महत्त्वाचा निर्णय विशेष बैठकीत घेतला.
ही माहिती नगराध्यक्ष (Chairperson) विजयकुमार नाटेकर तसेच मुख्याधिकारी (Chief Officer) नेहाल तळावणेंकर यांनी दिली. या निर्णयानुसार प्रभाग क्रमांक १० मधील ‘धनगरवाडो’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाड्याचे नाव बदलून ‘कुळणवाडो’ असे करण्यात येणार आहे. तसेच प्रभाग क्रमांक ३ मधील ‘हरिजनवाडो’ या परिसराला ‘राष्ट्रोळी नगर’ असे नवीन नाव देण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.
या संदर्भातील ठराव पालिका प्रशासनामार्फत संबंधित शासकीय विभाग, निवडणूक आयोग तसेच अन्य संबंधित कार्यालयांकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ठरावाची तातडीने अंमलबजावणी करून संबंधित वाड्यांमध्ये नव्या नावांचे फलक लावणे तसेच सर्व शासकीय व्यवहारांत नव्या नावांचा वापर करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ‘धनगरवाडो’ आणि ‘हरिजनवाडो’ ही नावे बदलण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. चर्चे दरम्यान नगरसेवकांनी आपापली मते मांडून या निर्णयाला पाठिंबा दिला. मानवाधिकार आयोगाच्या शिफारशी तसेच पालिका प्रशासन खात्याच्या सूचनांनुसार हे नामकरण करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीत शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. मार्च किंवा एप्रिल महिन्यात पालिका निवडणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणुकांपूर्वीच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जमा-खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच पालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकावरही सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस उपनगराध्यक्ष दीपा पळ, नगरसेवक कुंदन फळारी, राजाराम गांवकर, सुदन गोवेकर, निलेश टोपले, अनिकेत चणेकर, गुंजन कोरगांवकर, दीपा शिरगांवकर, रंजना वांगणकर, अपर्णा फोगेरी आदी उपस्थित होते.