म्हणाले-अन्यथा आमरण उपोषण करू!

पणजी : सांताक्रूझ येथील ऐतिहासिक बोंडवेल तलावाच्या अस्तित्वाचा प्रश्न आता अधिकच गंभीर झाला असून, ग्रामस्थांनी गोवा राज्य पाणथळ प्राधिकरणाकडे (State Wetland Authority) आणि सरकारकडे मागणी केली आहे. तलावाच्या संरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या मागण्यांवर एका आठवड्यात कार्यवाही न झाल्यास 'आमरण उपोषण' छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आठवडाभरातील घडामोडींचा आढावा घेऊन आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल आणि वेळ पडल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. आझाद मैदानावर पत्रकार परिषद पार पडली.
तलावाच्या प्रभाव क्षेत्राबाबत (Influence Zone) सध्या प्रशासकीय पातळीवर प्रचंड संभ्रम असून त्याचा फायदा घेत बेकायदेशीर बांधकामे सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तलावाच्या संरक्षणाचे नियम परस्परविरोधी असून, ओलाची जमीन अधिसूचनेनुसार ५० मीटरचा बफर झोन आवश्यक आहे, तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तलावाभोवती १०० मीटरचे बांधकाम विरहित क्षेत्र (No Construction Zone) असणे अनिवार्य आहे. मात्र, जमिनीवर प्रत्यक्षात यापैकी कोणत्याही झोनची सीमा निश्चिती करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, कोणत्याही प्रकारचा हायड्रोलॉजिकल सर्व्हे (Hydrological Survey) न करताच तलावाच्या संवेदनशील परिसरात बांधकामांसाठी परवानग्या दिल्या जात आहेत, आणि यामुळे तलावाच्या नैसर्गिक जलस्त्रोतांना धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणात गोवा राज्य पाणथळ प्राधिकरणाने तातडीने हस्तक्षेप करून तलावाचे सीमांकन करावे आणि त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सांताक्रूझ येथील नागरिकांनी केली आहे. तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न तातडीने न सुटल्यास ग्रामस्थ कोणत्याही स्तरावर जाऊन लढा देण्यास सज्ज झाले आहेत.
बातमी अपडेट होत आहे.