सुरावली येथील धिरयोवेळी एकजण जखमी

बंदीनंतरही सासष्टी तालुक्यात धिरयो सुरूच असल्याचे स्पष्ट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st February, 11:37 pm
सुरावली येथील धिरयोवेळी एकजण जखमी


मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाकडून समितीची निर्मिती करण्यात आलेली असतानाही सासष्टी परिसरात अजूनही धिरयो सुरू असल्याचे दिसते. रविवारी बाणावली परिसरात पाच ते सहा ठिकाणी धिरयो झाल्या. यातील सुरावली येथील धिरयोवेळी एकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी मात्र, या संदर्भात काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

 
धिरयोमुळे प्राण्यांना दुखापत होत असल्याने न्यायालयाकडून धिरयोवर बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाकडून धिरयोवर लक्ष ठेवण्यासाठी तालुकास्तरीय समित्यांची निर्मितीही केलेली आहे. यानंतरही डिसेंबर महिन्याच्या अखेरीस व जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कोलवा परिसरात दोन ठिकाणी धिरयो झाल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकारानंतर जिल्हा प्रशासनाकडून ज्या जागांवर धिरयो झाला आहे, त्या जागेच्या मालकांसह इतरही संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले होते. यानंतरही रविवारी बाणावली मतदारसंघाच्या विविध भागात दिवसभरात पाच ते सहा ठिकाणी धिरयो झाल्याची माहिती मिळालेली आहे. याशिवाय सुरावली येथील एका धिरयोवेळी शिंग लागल्याने एक व्यक्ती जखमी झाला असून तिच्यावर खासगी इस्पितळात उपचार केले जात असल्याची माहिती मिळत आहे. कोलवा पोलिसांना या प्रकारांबाबत विचारणा करण्यात आली असता, याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.      


हेही वाचा