फातोर्डा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन

अली खान खून प्रकरण : आणखी काहीजणांच्या अटकेची शक्यता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st February, 11:49 pm
फातोर्डा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन

मडगाव : घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील अली खान खूनप्रकरणात आतापर्यंत सात संशयितांना अटक झाली आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक नाथन आल्मेदा यांना राखीव दलात पाठवून सांगेचे पोलीस निरीक्षक दीतेंद्र नाईक यांच्याकडे अतिरिक्त ताबा दिला आहे. याशिवाय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश पावसकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आणखी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे.
पोलीस कोठडीत असताना संशयित अक्रम खान याच्या मोबाईलवरून तक्रारदार व त्याच्या नातेवाईकांना धमकीचे संदेश पाठवण्यात आले. त्यामुळे कामामध्ये कुचराई केल्याच्या कारणास्तव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश पावसकर यांचे निलंबन करण्यात आल्याचे समजते.
घोगळ हाऊसिंग बोर्ड येथे सुन्नी गुलिस्तान मशिदीच्या बाहेर नमाजानंतर मशिदीचे उपाध्यक्ष अली खान यांच्यावर चाकू हल्ला झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या खूनप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी संशयित अक्रम खान (रा. घोगळ, हाऊसिंग बोर्ड), साहिल उर्फ स्पायकी (रा. मंडोप, नावेली), मेहबूब मकानदार (रा. घोगळ, हाऊसिंग बोर्ड), ताज मकानदार (रा. घोगळ हाऊसिंग बोर्ड), अल्लादिन सय्यद (रा. फातोर्डा), रिझवान शेख (रा. शिरवडे, नावेली), उबेद मकानदार (रा घोगळ, हाऊसिंग बोर्ड), अलम सय्यद (रा. फातोर्डा), लतिफ सय्यद (रा. फातोर्डा), अयुब सय्यद (रा. फातोर्डा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
त्यातील संशयित अक्रम खान, लतिफ सय्यद, उबेद मकानदार व अलम सय्यद या चार संशयितांना अटक केलेली होती. त्यांना मडगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता, सात दिवसांची पोली​स कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर निजामुद्दीन सय्यद, हुसेन उर्फ फिरोज खान, साद्रुद्दी शेख या संशयितांना या तिघा संशयितांना अटक केली आहे. तर संशयित अक्रम खान व इतर संशयितांकडून गुलिस्तान मशिदीच्या परिसरात होणार्‍या लग्न समारंभ व इतर सोहळ्यांवेळी निधीच्या नावाखाली पैसे गोळा केले जात होते. मशिदीचे उपाध्यक्ष अली खान यांच्यासह आणखी काहीजणांचा या प्रकाराला विरोध होता व त्यासंदर्भात पोलिसात तक्रार केलेली होती. नेमक्या याच कारणावरून हा खुनी हल्ल्याचा प्रकार घडला असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.
जिल्हा प्रशासनाला उशिराने जाग
घोगळ हाउसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीतील वादाचा प्रकार हा मागील वर्षभरापासून सुरू आहे. या मशिदीसंदर्भात न्यायालयीन खटलाही सुरू आहे. वारंवार होणार्‍या वादामुळे दर शुक्रवारी फातोर्डा पोलिसांकडून या मशिदीच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यायचा. या वादाच्या पार्श्वभूमीवर फातोर्डा पोलिसांकडून दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाला या प्रकरणात लक्ष देऊन मशिदीवर प्रशासकाची नेमणूक करण्याचीही मागणी करण्यात आलेली होती. मात्र, खुनाचा प्रकार घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून दोन दिवसांसाठी मशिद सील करण्यात आली.      

हेही वाचा