
वास्को : गोव्यातील (Goa) झुआरी पुलावर झालेल्या स्वयंअपघातात २५ वर्षीय युवक ठार झाला. ठार झालेल्या युवकाचे नाव सर्वेश बोरकर (२५ वर्षे, गुड्डेमळ, सावर्डे, कुडचडे) असे आहे. येथील वळणावर दुचाकी घसरल्याने हा अपघात घडला.
अपघातानंतर सर्वेशला गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलात (Goa Medical College, Hospital) नेण्यात आले. येथील कॅज्युअल्टीतील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ७.२० वाजता बांबोळीतील कॅज्युअल्टीतील पोलिसांकडून वेर्णा पोलिसांना झुआरी पुलावरील अपघातातील एका युवकाला मृतावस्थेत आणल्याचा वायरलेस संदेश प्राप्त झाला. त्यानंतर उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन पाहणी केली व पुढील तपास केला. अतीवेगात वाहन चालवल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात वेर्णा पोलीस अधिक तपास करीत आहेत.