मुख्यमंत्री डॉ. सावंतांविषयी बोलताना आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचे उद्गार.

पेडणे: पेडणे तालुक्यातील तुये येथील १०० खाटांच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्घाटन आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते दिमाखात पार पडले. मात्र, या सरकारी कार्यक्रमात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या जुन्या आठवणींना दिलेला उजाळा विशेष चर्चेचा विषय ठरला. डॉ. प्रमोद सावंतांचा डॉक्टरकीचा राजीनामा एकेकाळी मी स्वीकारला होता, आज त्यांच्याच नेतृत्वाखाली आरोग्यमंत्री म्हणून काम करताना मला सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दांत राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तुये येथील हॉस्पिटल आता अधिकृतपणे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी (GMC) जोडले गेले आहे. या सोहळ्याला आरोग्यमंत्री विश्वजित राणे, स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर आणि अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजकीय प्रवासातील एक न उघडलेले पान जगासमोर मांडले.
मुख्यमंत्री राजकारणात येण्यापूर्वीचा तो प्रसंग विश्वजित राणे म्हणाले की, बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती नसेल, पण जेव्हा डॉ. प्रमोद सावंत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ते सरकारी सेवेत डॉक्टर म्हणून कार्यरत होते. योगायोगाने त्यावेळी मी आरोग्यमंत्री होतो आणि त्यांचा राजीनामा माझ्याकडे आला होता. तो राजीनामा मीच स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी आमदार म्हणून काम केले आणि आज ते राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आहेत. काळ कसा बदलतो पहा, ज्यांचा राजीनामा मी मंजूर केला होता, आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी आरोग्य खात्याची धुरा सांभाळत आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे ते म्हणाले. मी आणि मुख्यमंत्री एकत्रच! २०२७ मध्ये भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी काम करणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

८५ कोटींचे भव्य रुग्णालय जनतेच्या सेवेत तुये येथील या हॉस्पिटलची इमारत गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (GSIDC) सुमारे ८५ कोटी रुपये खर्चून उभारली आहे. १०० खाटांचे हे रुग्णालय आता पेडणे तालुक्यातील आरोग्याचा कणा ठरणार आहे. या हॉस्पिटलमध्ये एकूण १३ बाह्य रुग्ण विभाग (OPD) कार्यरत असणार आहेत. विशेष म्हणजे, 'जीएमसी'चे तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी येथे सेवा देणार असल्याने पेडणेकरांना आता उपचारासाठी पणजी किंवा बांबोळीला धाव घेण्याची गरज उरणार नाही.

आरोग्य सुविधांचा विस्तार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ग्रामीण भागातील जनतेला तज्ज्ञ आरोग्य सेवा घरपोच मिळाव्यात, हे आमचे उद्दिष्ट आहे. तुये हॉस्पिटलच्या माध्यमातून उत्तर गोव्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट झाली आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या प्रकल्पासाठी घेतलेल्या पुढाकाराचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमामुळे पेडणे तालुक्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला असून, आरोग्य आणि राजकीय एकजुटीचा एक अनोखा संदेश या निमित्ताने पाहायला मिळाला.