घरात २० लाख पुस्तकांचा खजिना! वाचनवेड्या एनके गौडाचा 'पद्मश्री'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास

कर्नाटकातील या अवलियाने पगार आणि आयुष्य वेचून जपले अफाट ज्ञानभांडार.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
34 mins ago
घरात २० लाख पुस्तकांचा खजिना! वाचनवेड्या एनके गौडाचा 'पद्मश्री'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास

बेंगळुरू : कुणाला कसला छंद असेल व या छंदापायी एखादी व्यक्ती कुठे पोहोचेल हे सांगता येत नाही. कर्नाटकातील (Karnataka) एका सामान्य व्यक्तीने असामान्य असे काम करून दाखवले आहे. आपल्या पुस्तके गोळा करण्याच्या छंदावर त्यांनी पगारातील ८० टक्के रक्कम खर्च केली. राहते घरच बनवले ग्रंथालय. या ग्रंथालयात २० लाखांपेक्षा अधिक पुस्तके (20 Lakhs Books) आहेत. त्याचा हा आगळावेगळा छंद त्याला पद्मश्री (Padma Shri award) पुरस्काराचा मान देवून गेला आहे. 

कर्नाटकातील या पुस्तक सम्राटाचे नाव एनके गौडा (Anke Gowda) असे असून, कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील हरलहल्ली गावातील रह‌िवासी आहे. ७७ वर्षीय गौडा आपल्या घरातील ग्रंथालयात सहकुटुंब रमत असतात. रस्त्याच्या कडेलाच त्यांचे घरवजा ग्रंथालय असून, बाहेरून पाहिल्यास काहीच समजत नाही. मात्र, आत गेल्या वर ग्रंथालयाचे भलेमोठे भांडार पहायला मिळते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तके गोळा करून ग्रंथालय बनवणारे एनके गौडा मोठे श्रीमंत नाहीत. सुरूवातीला ते बस कंडक्टर होते. नंतर साखर कारखान्यात काम करू लागले. साखर कारखान्यात ३० वर्षे काम करून मिळालेल्या पगारापैकी ८० टक्के पगार त्यांनी पुस्तके खरेदी करण्यावर खर्च केला. पुस्तके खरेदी करण्यासाठी आपली म्हैसूर येथील मालमत्ताही विकली. पैशांची कमतरता असल्याने त्यांनी देखभालीसाठी कर्मचारीही ठेवला नाही. पत्नी व मुलासोबत ग्रंथालयातच राहतात व एक छोटा कोपरा जेवण बनवण्यसाठी वापरतात. फरशीवरच झोपतात. गौडा यांच्या घरवजा ग्रंथालयात पुराण, उपनिषदे, कुराण, दोन ते तीनशे वर्षे जुनी इतिहासाची पुस्तके, रामायण व महाभारताच्या प्रत्येकी तीन हजार आवृत्त्या आहेत. अडीच हजार पुस्तके महात्मा गांधींवर आहेत.

पद्मश्री पुरस्कार जाहीर

दरम्यान, केंद्र सरकारने याची दखल घेत एनके गौडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 






हेही वाचा