या वर्षातील ही शेवटची विशेष रेल्वे.

मडगाव : 'मुख्यमंत्री देवदर्शन योजने'अंतर्गत या वर्षातील शेवटची विशेष रेल्वे १५०० भाविकांना घेऊन अयोध्येसाठी रवाना झाली आहे. भाविकांचा प्रतिसाद वाढल्याने या रेल्वेला दोन अतिरिक्त डबे जोडण्यात आले होते. या वर्षात वेलांकिणीसाठी एक आणि अयोध्येसाठी तीन अशा एकूण चार गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
मडगाव रेल्वे स्थानकावरून सोमवारी दुपारी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांच्या उपस्थितीत ही गाडी अयोध्येसाठी रवाना झाली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला आमदार तुयेकर, समाजकल्याण खात्याचे संचालक दीपक देसाई, वास्कोच्या नगरसेविका आमोणकर, मडगावच्या नगरसेविका सुनीता पराडकर, विजय सुरमे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार तुयेकर म्हणाले की, "मुख्यमंत्री देवदर्शन योजनेचा लाभ राज्यातील सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि राज्य सरकारला जाते. अनेक भाविकांना देवदर्शनाची इच्छा असते, परंतु आर्थिक किंवा इतर कारणांमुळे ते शक्य होत नाही. अशा लोकांसाठी सरकारने ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे." यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेल्या भाविकांनी प्रवासातील सोयी-सुविधा, भोजन आणि राहण्याच्या व्यवस्थेबाबत समाधानकारक प्रतिक्रिया दिल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मडगाव स्थानकावरून सोमवारी रवाना झालेली ही रेल्वे ४ फेब्रुवारीला सकाळी अयोध्येला पोहोचेल आणि त्याच दिवशी रात्री उशिरा परतीच्या प्रवासाला निघेल. या रेल्वेतील १५०० भाविक ६ फेब्रुवारी रोजी गोव्यात परततील.
या वर्षासाठी 'मुख्यमंत्री देवदर्शन योजने'अंतर्गत १० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी मागील वर्षाची २ कोटी रुपयांची थकबाकी भागवण्यात आली असून, उर्वरित ८ कोटी रुपयांच्या निधीतून यावर्षी अयोध्या आणि वेलांकिणी येथील यात्रेचे नियोजन यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे.