
पणजी : केंद्रीय शिक्षण खाते (Central Education Department), नॅशनल बुक ट्रस्ट (National Book Trust) आणि गोवा सरकारतर्फे (Goa Government) पणजीत (Panjim) ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दयानंद बांदोडकर मैदानावर भरवण्यात येईल. येथे २५० हून अधिक स्टॉलवर देशभरातील १०० हून अधिक प्रकाशक सहभागी होणार आहेत. नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक युवराज मलिक यांनी ही माहिती दिली. सोमवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मलिक यांनी सांगितले की, प्रदर्शनाचे उद्घाटन ४ रोजी दुपारी ४.३० वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होईल. यावेळी कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित राहतील.
पाच दिवसीय प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून; ते दररोज सकाळी ११ ते रात्री ८ दरम्यान खुले असणार आहे. प्रदर्शनात पुस्तकांवर १० टक्के किंवा अधिक डिस्काउंट दिले जाईल.
महोत्सवादरम्यान दरोराज १० ते १.३० दरम्यान लहान मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पोस्टर बनवणे, कथाकथन, कार्टून बनवणे अशा विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आचार्य प्रशांत, सदानंद मोरे, मृणाल कुलकर्णी, कॅप्टन शुभांशू शुक्ला, सचिन पिळगावकर यांच्यासह अन्य मान्यवर मार्गदर्शन करतील.
पुस्तकांच्या विक्रीत वाढ
मलिक म्हणाले की, सध्या डिजिटल युग आहे. असे असले तरी पुस्तक विक्रीत देखील वाढ होत आहे. कोविड नंतर नॅशनल बुक ट्रस्टच्या पुस्तकांची विक्री वाढत आहे. शाळा, महाविद्यालयांनी अर्ज केल्यास ट्रस्टतर्फे २५ हजार रुपयांची पुस्तके मोफत दिली जातात.