प्राथमिक तपासात ती आत्महत्या असल्याचे निष्पन्न : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी

बिट्स पिलानी विद्यार्थीनी मृत्यू प्रकरण : आमदार रेजिनाल्ड यांच्याकडून संस्थेवर कारवाईची मागणी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
36 mins ago
प्राथमिक तपासात ती आत्महत्या असल्याचे निष्पन्न : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी

मडगाव : वेर्णा येथील बिट्स पिलानी संस्थेच्या मुलींच्या वसतिगृहात २० वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची माहिती रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असला, तरी प्राथमिक चौकशीत हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी दिली. दरम्यान, आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे संबंधित संस्थेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.




मृत विद्यार्थिनी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. बिट्स पिलानी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची ही पहिलीच घटना नाही; यापूर्वीही पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यातील एका विद्यार्थ्याच्या रक्त तपासणीत अमली पदार्थांचे (ड्रग्ज) अंश आढळल्याने खळबळ उडाली होती. तेव्हापासून संस्थेतील अमली पदार्थांच्या पुरवठ्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या विषयावर विधानसभेतही चर्चा झाली असून, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांवरील अभ्यासाच्या तणावाबाबत चिंता व्यक्त केली होती.




जिल्हाधिकारी क्लिटस यांनी सांगितले की, विद्यार्थिनीचे पालक गोव्यात येत असून, त्यानंतरच शवविच्छेदन केले जाईल. सखोल तपासानंतर अधिक माहिती समोर येईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने 'दक्षिण गोवा जिल्हा समिती' स्थापन केली आहे. या समितीने वेळोवेळी संस्थेतील उपाययोजनांचा आढावा घेऊन ऑनलाइन समुपदेशन केंद्र व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. संस्थेने त्या अनुषंगाने काही बदलही केले होते, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.



Post-mortem reveals health neglect in BITS student death, not suicide -  Goemkarponn - Goa News


विद्यार्थ्यांच्या मृत्यूकडे दुर्लक्ष नको 

 आमदार रेजिनाल्ड आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. बिट्स पिलानी संस्थेतील वर्षभरातील हा सहावा मृत्यू आहे. अशा घटनांमुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संस्थेवर कारवाईची मागणी करणार आहे, असे त्यांनी सांगितले. अनेकदा विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर नातेवाईक पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्यामुळे पोलिसांची विनाकारण बदनामी होते. हे विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत, त्यामुळे त्यांच्या मृत्यूकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. अमली पदार्थांच्या उपलब्धतेबाबत समाजमाध्यमांवरून सातत्याने तक्रारी येत असून, मागील पाच मृत्यूंचा तपासही अद्याप प्रलंबित असल्याने आता कठोर कारवाईची गरज असल्याचे रेजिनाल्ड यांनी नमूद केले.


Goa BITS Pilani Hostel Suicide; Krishna Kasera | Lucknow Student


राज्यात इतरही अनेक शैक्षणिक संस्था आहेत, जिथे विद्यार्थी तणावाचा सामना करतात. मात्र, केवळ बिट्स पिलानीमध्येच अशा घटना का घडत आहेत, असा सवाल आता समाजमाध्यमांतून नागरिक उपस्थित करत असून संस्थेच्या कारभारावर कडक टीका होत आहे.


हेही वाचा