रेल्वे सुरक्षा दल सतर्क; ९८ हरवलेल्या मुलांची सुटका

मडगाव : कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावर वर्षभरात रेल्वे सुरक्षा दलाकडून (RPF) १.२२ कोटींचे विसरलेले सामान प्रवाशांना परत करण्यात आले. ९८ हरवलेल्या मुलांची सुटका करण्यात आली तर १०.७१ लाखांची अवैध दारू जप्त केली. ६५ जणांवर कारवाई केली. ४ प्रवाशांचे प्राण वाचवले तर ४० चोरांना अटक करून ४८.६७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि निर्भय करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने कंबर कसली आहे. गेल्या एका वर्षात आरपीएफने विविध मोहिमांतर्गंत गुन्हेगारांवर वचक बसवला आहे. प्रवाशांचे हरवलेले सामान परत मिळवून देत आणि मुलांची सुटका करत माणुसकीचे दर्शनही घडवले आहे.
'ऑपरेशन अमानत' अंतर्गत आरपीएफने २५२ प्रवाशांचे विसरलेले सामान शोधून त्यांच्या स्वाधीन केले. या सामानाची एकूण किंमत १ कोटी २२ लाख ४८ हजार इतकी असून, रेल्वे पोलिसांच्या या प्रामाणिकपणामुळे प्रवाशांचा रेल्वेवरील विश्वास वृद्धिंगत झाला आहे.
९८ मुले पालकांच्या स्वाधीन
'नन्हे फरिश्ते' मोहिमेतून ९८ चिमुरड्यांना जीवदान
सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवत, आरपीएफने रेल्वे स्थानक किंवा गाड्यांमध्ये एकटे आढळलेल्या ९८ अल्पवयीन मुलांची सुटका केली. 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत या मुलांचे संभाव्य शोषण थांबवून त्यांना पुनर्वसनासाठी 'चाइल्ड हेल्पलाईन'च्या स्वाधीन करण्यात आले.
अवैध दारूविक्रीवर कठोर कारवाई
कोकण रेल्वेवरून होणारी अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी आरपीएफने 'ऑपरेशन सतर्क' राबवले. यात ६,८७७ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या, ज्यांची किंमत १०.७१ लाख आहे. या प्रकरणी ६५ जणांना अटक करून अवैध व्यापाराला लगाम घातला आहे. प्रवाशांचे सामान चोरणाऱ्या ४० गुन्हेगारांना अटक करून ४८.६७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. 'जीवन रक्षा' उपक्रमांतर्गत सतर्क जवानांनी ४ प्रवाशांचे प्राण वाचवले. साखळी ओढणे (ACP) आणि इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २२२ जणांवर रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये कारवाई केली. प्रवासी सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आरपीएफचे जवान २४ तास डोळ्यांत तेल घालून कार्यरत असून, आगामी काळातही ही दक्षता अधिक कडक केली जाईल, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.