
नवी दिल्ली : दिल्लीतून (Delhi) दररोज ६३ लोक हरवत असल्याचे एका पाहणीत दिसून आले आहे. मानवी तस्करी (Human Trafficking) होत असून, २०१५ ते २०२५ या ११ वर्षांच्या कालावधीत दररोज ६३ लोक बेपत्ता झाल्याची माहिती पुढे आली आहे. दिल्लीतून एकूण २ लाख ५५ हजार ४३२ लोक बेपत्ता झाले. त्यातील २ लाख १ हजार ४५५ लोकांना पोलिसांनी (Delhi Police) शोधून काढले. मात्र, ५३ हजार ९७७ लोक अजूनही बेपत्ता आहेत. गेल्या ११ वर्षांत जन्मजात बाळ ते १८ वर्षांपर्यंत ५ हजार ५५९ जण बेपत्ता झाल्याचेही ही आकडेवारी दाखवत आहे.
बेपत्ता झालेल्या साडेपाच हजारांपैकी ४ हजार ८६४ मुलांना पोलिसांनी शोधून काढले आहे. एका आकडेवारीनुसार दिल्लीतून दररोज ६३ लोक बेपत्ता झाले आहेत. मानव तस्करी केली जात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मानव तस्करी झालेल्या ६ हजार ७५९ मुलांची पोलिसांनी सुटका केली आहे. त्यात ३ हजार २८१ मुले तर २ हजार, १३४ मुलींचा समावेश आहे. मानव तस्करीचे २ हजार ४०७ गुन्हे दिल्लीत दाखल झाले आहेत. या मुलांमध्ये बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल येथून आणलेल्यांचा समावेश आहे. देशातील मानव तस्करीचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, २५० हून अधिक जास्त सामाजिक संघटनांनी २०२३ ते २०२६ या दरम्यान १ लाख २५ हजार, ४०८ मानव तस्करीत सापडलेल्या मुलांची सुटका केली आहे. त्यातील ५६ हजार ४५९ मानव तस्करीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.