विक्रमी लक्ष्य गाठत भारतीय संघ अंतिम फेरीत

१९ वर्षांखालील विश्वचषक : अफगाणिस्तानवर ७ गड्यांनी मात

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
विक्रमी लक्ष्य गाठत भारतीय संघ अंतिम फेरीत

हरारे : आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारतीय युवा संघाने ऐतिहासिक कामगिरी करत सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानचा पराभव केला आणि दहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. तब्बल ३११ धावांचे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करत भारताने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत मोठा रन चेज आपल्या नावावर केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय अफगाणिस्तानच्या कर्णधाराने घेतला आणि त्यांच्या फलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. सलामी जोडीने संयमी सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. ओस्मान सदतने ३९, तर खलिद अहमदजाईने ३१ धावा करत संघाला भक्कम पाया दिला.
त्यानंतर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आलेल्या फैजल खान आणि उजैरुल्लाह नियाजई यांनी भारतीय गोलंदाजांवर आक्रमक फलंदाजी केली. फैजल खानने ९३ चेंडूंमध्ये १५ चौकारांसह ११० धावा, तर उजैरुल्लाह नियाजईने ८६ चेंडूंमध्ये १२ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०१ धावा ठोकल्या. या दोन शतकांच्या जोरावर अफगाणिस्तानने ५० षटकांत ४ गडी बाद ३१० धावा उभारल्या.
इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग याआधी भारतीय अंडर-१९ संघाने कधीच केला नव्हता. त्यामुळे दबाव निश्चितच होता. मात्र, भारतीय फलंदाजांनी आत्मविश्वास आणि आक्रमकतेचा सुंदर संगम दाखवला.
सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने पहिल्या चेंडूपासूनच अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने केवळ ३३ चेंडूंमध्ये ६८ धावा करत सामना भारताच्या बाजूने वळवला. या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार होते.
वैभव आणि आरोन जॉर्ज यांनी पहिल्या विकेटसाठी ९० धावांची झंझावाती भागीदारी केली.
वैभव बाद झाल्यानंतरही भारतीय डावाची गती कमी झाली नाही. आरोन जॉर्जने जबाबदारीने फलंदाजी करत ९५ चेंडूंमध्ये दमदार शतक साकारले.
कर्णधार आयुष म्हात्रेनेही नेतृत्वाला साजेशी खेळी करत ५९ चेंडूंमध्ये ६२ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ४ षटकार लगावले. शेवटी आरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्रा यांनी संयमी भागीदारी करत भारतीय संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.
रेकॉर्डब्रेक कामगिरी
या विजयासह भारताने अंडर-१९ वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी रन चेजचा विक्रम केला. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या इतिहासात याआधी न्यूझीलंडने ३०५ धावांचा केलेला पाठलाग सर्वोच्च होता. भारताने तो विक्रमही मागे टाकला.
फायनलमध्ये जोशात टीम इंडिया
या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास शिखरावर पोहोचला असून, अंतिम फेरीतही अशीच आक्रमक आणि संयमी कामगिरी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. युवा खेळाडूंच्या या कामगिरीने भारतीय क्रिकेटचे उज्ज्वल भविष्य पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. ६ फेब्रुवारी रोजी टीम इंडिया इंग्लंडशी सामना करणार आहे.
भारताचा सर्वोच्च यशस्वी पाठलाग
२४५ धावा (२०२४, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध)
२२६ धावा (२०१२, ऑस्ट्रेलियाविरुद्ध)
२१७ धावा (२०१८, ऑस्ट्रेलियाविरुद्ध)