जीवलग मैत्रिणींमध्ये जेतेपदासाठी झुंंज!

बंंगळुरु विरुद्ध दिल्लीमध्ये आज महामुकाबला

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
जीवलग मैत्रिणींमध्ये जेतेपदासाठी झुंंज!

वडोदरा : महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल २०२६) चा चौथा हंगाम आता निर्णायक टप्प्यावर आला असून क्रिकेटप्रेमींच्या नजरा थेट अंतिम सामन्यावर खिळल्या आहेत. गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए स्टेडियम, कोटंबी येथे विजेतेपदासाठी दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. विशेष म्हणजे हा सामना केवळ दोन संघांमधील नाही, तर जीवलग मैत्रीणी असलेल्या स्मृती मनधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांच्यातील प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे.
एकीकडे गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत थेट अंतिम फेरीत प्रवेश करणारी स्मृती मंधानाची रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी), तर दुसरीकडे एलिमिनेटरमध्ये गुजरात जायंट्सचा पराभव करत सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचलेली जेमिमा रॉड्रिग्सची दिल्ली कॅपिटल्स (डिसी) सज्ज झाली आहे.
दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना केवळ अंतिम नाही, तर अस्तित्वाची लढाई आहे. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामापासून दिल्लीने प्रत्येक वेळी अंतिम फेरी गाठली आहे; मात्र अद्याप जेतेपदाची मोहोर उमटवता आलेली नाही. यंदा एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्सने दिलेले १६९ धावांचे आव्हान दिल्लीने अवघ्या १७.४ षटकांत ३ गडी गमावत पूर्ण केले. शफाली वर्मा आणि लिजेल ली यांच्या ८९ धावांच्या आक्रमक सलामीने दिल्लीचा विजय जवळपास एकतर्फी ठरला. आता ‘चौथी संधी’ साधत विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार दिल्लीच्या गोटात दिसून येतो.
बंंगळुरूचे पारडे जड
दुसरीकडे, मागील हंगामातील विजेत्या आरसीबी संघाने यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण कामगिरी केली आहे. ८ पैकी ६ सामने जिंकत त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. विशेष म्हणजे २०२४ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने दिल्लीचाच पराभव करत जेतेपद मिळवले होते. तोच इतिहास पुन्हा घडवण्यासाठी स्मृती मनधानाच्या नेतृत्त्वाखाली बेंगळुरूचा संघ सज्ज आहे. ग्रेस हॅरिस, ऋचा घोष आणि श्रेयंका पाटील यांसारख्या मॅच-विनर खेळाडूंमुळे आरसीबीचे पारडे किंचित जड मानले जात आहे.
आजचा सामना
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स

स्थळ: बीसीए स्टेडियम, कोटंंबी, वडोदरा
वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ हॉटस्टार