मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : पणजीत पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन

पणजी : गोव्यात खाण्यापिण्याचे विविध उत्सव होत असतात. मात्र, यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामुळे युवा पिढीला लेखन, वाचनाची आवड निर्माण होऊन नवीन साहित्यिक निर्माण होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.
बुधवारी पणजीत नॅशनल बुक ट्रस्टतर्फे (एनबीटी) आयोजित पुस्तक महोत्सवात ते बोलत होते. यावेळी किरण ठाकूर, मिलिंद मराठे, युवराज मलिक, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, हा महोत्सव केवळ आनंद घेण्यासाठी नसून ज्ञान देणारा देखील आहे. येथे देशभरातील अनेक प्रकाशकांची लाखो पुस्तके उपलब्ध आहेत. गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी शिक्षण खात्याने येथे भेट देण्याबाबत शाळांना सूचना केली आहे. पालकांसाठी देखील हा महोत्सव उपयुक्त आहे. हल्लीची पिढी मोबाईल रील, सोशल मीडियात व्यस्त असते. त्याऐवजी त्यांना वाचनाची आवड लावावी. सध्या मोबाईलवर पुस्तके उपलब्ध असली तरी ती हातात घेऊन वाचण्याचा अनुभव अधिक चांगला असतो.
ते म्हणाले, एनबीटीने याआधी दिल्ली येथे असेच प्रदर्शन भरवले होते. तेथे ९ दिवसांत ५०० कोटी रुपयांची पुस्तकांची विक्री झाली. डिजिटल युगातही पुस्तकांची ओढ कायम असणे ही चांगली गोष्ट आहे. यामुळे नवीन लेखक, प्रकाशक तसेच वाचकांना हुरूप मिळेल. गोव्यात पुस्तके विकत घेण्याची संस्कृती आजही आहे. युवा पिढी येथील संस्कृती विसरलेली नाही. मराठी संगीत नाटक स्पर्धेत गोव्यातील नाटके यश मिळवत आहेत. येथे आता मराठीसह कोकणी भाषेमध्येही विपुल लेखन होत आहे, ही अभिमानाची बाब आहे.
सरकार मदत करण्यास तयार
मुख्यमंत्री म्हणाले की, एनबीटीतर्फे दरवर्षी हा महोत्सव गोव्यात घेण्याचा विचार केल्यास राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहे. विकसित भारताची सुरुवात विकसित वाचकांपासून होणार आहे. असे महोत्सव विकसित भारताचा पाया ठरणार आहे.