स्वतःचा इतिहास विसरणाऱ्या समाजाला भविष्य नसते : डॉ.हनुमंत चोपडेकर

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
स्वतःचा इतिहास विसरणाऱ्या समाजाला भविष्य नसते : डॉ.हनुमंत चोपडेकर

पणजी : जो समाज स्वतःचा इतिहास (History) विसरतो त्याला भविष्य नसते. इतिहास आपली मुळे असतात. तीच कापली तर आपण वर जाऊ शकणार नाही. यामुळे इतिहासातून प्रेरणा घेऊन, वर्तमान स्थिर करून भविष्याचा वेध घ्यायचे असेल तर आपल्या भाषेला, संस्कृतीला विसरून चालणार नाही; असे प्रतिपादन डॉ. हनुमंत चोपडेकर यांनी केले. बुधवारी २९ व्या राजभाषा दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. नितिन बोरकर, दामोदर घाणेकर, विवेक पिसुर्लेकर उपस्थित होते. 

चोपडेकर म्हणाले की, राजभाषेबाबत वेगवेगळे गट विचार अस्तित्वात होते. गोवा विधानसभेच्या (Goa Assembly) विशेष अधिवेशनात ४ फेब्रुवारी १९८७ रोजी राजभाषा कायदा संमत करण्यात आला. याद्वारे केवळ भाषिक नव्हे तर गोव्याची प्रादेशिक अस्मिता जपण्याचा प्रयत्न झाला होता. आज प्रत्येक गोमंतकीयाला विशेष करून युवा पिढीला याची फळे मिळत आहेत. १६ जानेवारी रोजी अस्मिता दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला आपण पाठिंबा दिला पाहिजे. सरकारी पाठबळ असल्यानेच असे कायदे शक्य आहेत.

ते म्हणाले, गोव्याला मोठा इतिहास आहे. नव्या पिढीला याची माहिती असणे आवश्यक आहे. गोव्यातील युवा पिढीला कोकणी भाषा (Language), साहित्य, संस्कृती (Culture) याबाबत अधिक माहिती नाही. सध्याच्या पिढीला आपल्या आयुष्यात भाषेचे आणि संस्कृतीचे महत्व काय आहे यांची जाणीव कमी आहे. यासाठी असे कार्यक्रम आयोजित करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. प्रत्येक गोमंतकीय व्यक्तीला राजभाषा, अस्मिता दिवस आपला दिवस वाटला पाहिजे. याची जाणीव झाल्यावर आपली खरी प्रगती सुरू होईल. 

..तर गोवा झाला असता तालुका

डॉ. चोपडेकर म्हणाले की, युवा पिढीला जनमत कौलाचा इतिहास माहिती असणे देखील आवश्यक आहे. जन्मत कौल झाला नसता तर गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता. गोवा सिंधुदुर्गातील एक तालुका झाला असता. गोव्याची आता जेवढी प्रगती झाली आहे तेवढी झालीच नसती.

हेही वाचा