कोरगावात बांगलादेशी नागरिकाचा अवैध मुक्काम; मध्यरात्री छापा टाकून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
कोरगावात बांगलादेशी नागरिकाचा अवैध मुक्काम; मध्यरात्री छापा टाकून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पणजी : गोव्यात अवैध रित्या वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध पेडणे पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली असून, शनिवारी मध्यरात्री केलेल्या एका कारवाईत एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय कोरगाव-पेडणे येथे राहत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ३१ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२:२५ च्या सुमारास पेडणे पोलिसांना कोरगाव येथील पेठेचावाडा भागात एक संशयित व्यक्ती राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता, संबंधित व्यक्तीकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेले पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर कोणतेही वैध प्रवास दस्तऐवज नसल्याचे आढळून आले.

अब्दुर रहमान (३४ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो मूळचा बांगलादेशातील गोपाळगंज येथील रहिवासी असून सध्या कोरगाव, पेडणे येथील पेठेचावाडा भागात भाड्याच्या खोलीत राहत होता. आरोपीने भारतीय सीमा ओलांडून गोव्यात प्रवेश केला आणि कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय तो येथे वास्तव्यास होता.

या प्रकरणी पेडणे पोलिसांनी भारतीय इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ॲक्ट २०२५ च्या कलम २३(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई उत्तर गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीन विष्णूदास हलर्णकर यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक साहिल शांताराम नाईक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

या घटनेचा अहवाल ३१ जानेवारी २०२६ रोजीच पेडणे येथील प्रथमवर्ग (JMFC) न्यायालयात पाठवण्यात आला आहे. पर्यटनाच्या नावाखाली किंवा रोजगाराच्या शोधात गोव्यात अशा प्रकारे अवैध रित्या राहणाऱ्या विदेशी नागरिकांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.


हेही वाचा