
पणजी: गोवा विधानसभेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ मार्च २०२६ पासून सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी विधानसभेचे हे अधिवेशन बोलावले. ६ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची औपचारिक सुरुवात होणार आहे. २०२७च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल.
हे अधिवेशन एकूण १४ दिवसांचे असून, यामध्ये राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. या सत्रात प्रामुख्याने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. या अर्थसंकल्पात सरकार कोणती नवीन धोरणे जाहीर करते आणि विविध क्षेत्रांसाठी किती निधीची तरतूद केली जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. गोव्याची आर्थिक स्थिती, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि आगामी विकासकामांच्या प्राधान्यक्रमावर या अधिवेशनात सविस्तर चर्चा होईल.

विधानसभेच्या या सत्रात केवळ अर्थसंकल्पावरच नव्हे, तर राज्यातील विविध प्रलंबित मुद्दे आणि जनहिताच्या विषयांवरही वादविवाद आणि चर्चा अपेक्षित आहे. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी अधिकृतपणे हे अधिवेशन बोलावल्याने आता विधिमंडळ सचिवालयाकडून अधिवेशनाच्या तयारीला वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोन्ही बाजूंनी जनतेच्या प्रश्नांवरून या अधिवेशनात जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.