‘तिरुमला तिरुपती’ मल्टीस्टेटमध्ये पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची गर्दी

सोसायटीची एनओसी रद्द केल्यानंतर ठेवीदारांत संभ्रम

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
‘तिरुमला तिरुपती’ मल्टीस्टेटमध्ये पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची गर्दी

पणजी : गोव्याच्या (Goa) सहकार निबंधकांनी एनओसी मागे घेतल्यानंतर तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट सहकारी क्रेडीट सोसायटीच्या (Tirumalla Tirupati Multistate Co-operative Credit Society) पाटो-पणजी तसेच राज्यातील अन्य शाखांत पैसे काढण्यासाठी ठेवीदारांनी बुधवारी गर्दी केली.  दरम्यान, तिरुमाला तिरुपती मल्टीस्टेट सहकारी क्रेडीट सोसायटीचे संचालक मंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेत यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.  

ऑडिट अहवाल सादर करण्यास आलेले अपयश व अटींचा भंग करण्यात आल्याने तिरुमला तिरुपती बहुराज्य सहकारी सोसायटीला सहकार निबंधकांनी झटका दिला. राज्यात १३ ठिकाणी शाखा सुरू करण्यासाठी सोसायटीला दिलेला ‘ना हरकत’ दाखला (एनओसी) सहकार निबंधकांनी काल रद्द केला होता. तिरुमला तिरुपती सहकारी सोसायटीच्या राज्यात १७ शाखा आहेत. या शाखा सुरू राहणार असल्या तरी गुंतवणूक वा अन्य व्यवहार करताना सतर्कता बाळगावी, अशी सूचना सहकार निबंधकांनी गुंतवणूकदारांना केली होती. मात्र, हे वृत्त समजल्यावर राज्यभरातील ठेवीदारांनी सोसायटीच्या शाखांमध्ये बुधवारी पैसे काढण्यासाठी गर्दी केली. 

माशेल महिला सहकारी बँक, व्हिजनरी सहकारी बँक अशा बँकांतील गैरव्यवहारांमुळे हजारो ठेवीदारांचे लक्षावधी रुपये बुडाले आहेत. सहकारी सोसायट्या व बँकांतील गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला अद्याप पूर्णत: यश आलेले नाही. दुसरीकडे नवीन सहकारी सोसायट्या उघडण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर तिरुमला सोसायटीला राज्यात आणखी १३ शाखा उघडण्यासाठी दिलेली मान्यता सहकार निबंधकांनी रद्द केली आहे.

तिरुमलाचे संचालक मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा 

तिरुमलाची ‘एनओसी’ रद्द केल्याने राज्यातील गुंतवणूकदारांचे भवितव्य काय? असा प्रश्न पत्रकारांनी आज मुख्यमंत्र्यांना केला असता त्यांनी ठोस असे भाष्य केले नाही. तिरुमला सोसायटीचे संचालक आज बुधवारी मला भेटणार आहेत. त्यांनी स्वतःहून भेट मागितली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. यामुळे या भेटीत बँकेची रद्द झालेली एनओसी व इतर बाबींवर चर्चा अपेक्षित आहे.








हेही वाचा