महाशिवरात्री आणि आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
महाशिवरात्री आणि आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

मडगाव: कोकण रेल्वे मार्गावर महाशिवरात्री उत्सव आणि आंगणेवाडी यात्रेनिमित्त विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाशिवरात्री उत्सवानिमित्त यशवंतपूर - मडगाव जंक्शन - यशवंतपूर एक्स्प्रेस ही विशेष गाडी सुरू करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०६५०७ यशवंतपूर येथून शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०६५०८ मडगाव येथून १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.४५ वाजता यशवंतपूरला पोहोचेल. ही २० डब्यांची गाडी चिकबाणवर, चन्नरायपटण, हसन, सकलेशपूर, सुब्रमण्य रोड, कबकापुत्तूर, बंटवाला, सुरथकल, मुल्की, उडुपी, बारकूर, कुंदापुरा, मूकांबिका रोड बैंदूर, भटकळ, मर्डेश्वर, होन्नावर, कुमटा, गोकर्ण रोड, अंकोला आणि कारवार येथे थांबेल.

तसेच आंगणेवाडीच्या यात्रेनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) - मडगाव ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०१००४ मडगाव येथून ७ आणि ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वाजता एलटीटीला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१००३ एलटीटी येथून ८ आणि १० फेब्रुवारी रोजी सकाळी ७.५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.०० वाजता मडगावला पोहोचेल. २२ डब्यांची ही गाडी करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल. गाडी क्रमांक ०१००४ साठीचे बुकिंग ४ फेब्रुवारीपासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा