
पणजी : हरित ऊर्जेच्या (Green energy) दिशेने महत्त्वपूर्ण झेप घेत, गोव्याने (Goa) गेल्या नऊ महिन्यांत स्थापित हरित ऊर्जा क्षमतेत २५ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. या वाढीकडे हरित ऊर्जेचे गोव्याचे लक्ष्य पूर्तीचे एक सक्षम पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
गोव्याने २०३० पर्यंत १५० मेगावॅट (MW) अक्षय ऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत ७३.४३ मेगावॅट हरित ऊर्जा निर्माण करण्याचे लक्ष्य गाठले आहे. २०१९ मध्ये राज्याच्या सौर ऊर्जा (renewable power) अभियानाने सुरूवातीपासून अक्षय ऊर्जा निर्मितीत सातत्यपूर्ण आणि वेगाने वाढ अनुभवली आहे.
१ एप्रिल २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान सौर ऊर्जा क्षमता ५८.४३ मेगावॅटवरून ७३.४३ मेगावॅटपर्यंत वाढली. म्हणजेच सुमारे २५.६७ टक्के एवढी वाढ झाली आहे. छतावरील सौर ऊर्जा कार्यक्रम (rooftop solar power programme) गती घेत आहे. आतापर्यंत सुमारे ६४ मेगावॅट एवढे छतावरील ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट पू्र्णत्त्वाकडे आहे. डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील एकूण सौर ऊर्जा प्रतिष्ठापना ७१.४४ मेगावॅट होती.
त्यानंतर सौर ऊर्जा निर्मितीत आणखी वाढ झाली असली तरी, इतर अक्षय ऊर्जा स्रोत मोठ्या प्रमाणात स्थिर राहिले आहेत. बायोगॅस आणि कचरा ऊर्जा प्रकल्पांमधून वीज निर्मिती १.९४ मेगावॅटवर अपरिवर्तित राहिली आहे. जलविद्युत ऊर्जा निर्मिती केवळ ०.०५ मेगावॅटपर्यंत मर्यादित आहे.
सध्या, गोव्याची दैनंदिन विजेची मागणी सुमारे ५४० मेगावॅट आहे आणि ‘पीक अवर्स’मध्ये ती जवळपास ७५० मेगावॅटपर्यंत वाढते. गोवा राज्य ऊर्जा दृष्टी २०५० नुसार, राज्याचे उद्दिष्ट २०३० पर्यंत १५० मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्माण करणे आणि २०५० पर्यंत संपूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले राज्य बनणे आहे.राज्याने २०३०च्या राष्ट्रीय मुदतीच्या एक वर्ष आधी, म्हणजेच २०२९ पर्यंत ५०० गिगावॅट वीज क्षमता गाठण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य देखील ठेवले आहे.