दिनदयाळ ग्रामीण कौशल्य योजनेखाली उपक्रम

पणजी : राज्यात इयत्ता ८ ते १० पर्यंतचे शिक्षण (Education) घेतलेल्या बेरोजगारांना ३ महिने किंवा ६ महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन नोकरीची संधी उपलब्ध करून देणारी योजना गोवा सरकार (Goa Government) अंमलात आणणार आहे. प्रशिक्षण (Training) घेतल्यानंतर ७० टक्के युवकांना खासगी नोकरी मिळणार, अशी माहिती मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. दिनदयाळ ग्रामीण कौशल्य योजनेखाली हा उपक्रम सुरू होणार.
पर्वरी मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. भारत सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने ३ महिने आणि ६ महिने असे दोन पातळीवर प्रशिक्षण देण्याची योजना आहे. प्रशिक्षणाच्या काळात दिवसाला १६० रुपये प्रमाणे विद्यावेतन (स्टायफंड) देणार. प्रशिक्षणासाठी कुठलेही शुल्क असणार नाही. राज्यात १७ ठिकाणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. आतापर्यंत ३०० युवकांनी नोंद केली आहे. इच्छुकांनी नावनोंदणी करून लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. युवकांसाठी १८ ते ३५ तर महिला, एससी, एसटी यांच्यासाठी १८ ते ४५ अशी वयाची अट आहे. पंचायतीकडून उत्पन्नाचा दाखला घेऊन तो सादर करावा लागणार. प्रशिक्षणानंतर फ्रंट ऑफीस, हाऊस किपिंग, फूड अॅंड बिवरेज, रिटेल सेल या क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध होणार.