शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी शाळांचे वेळापत्रक जाहीर

'या' तारखेपासून शाळा होणार सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी  शाळांचे वेळापत्रक जाहीर

पणजी: गोवा सरकारच्या शिक्षण संचालनालयाने आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीचे अधिकृत वेळापत्रक आणि सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या नव्या वेळापत्रकानुसार, इयत्ता पहिली ते पाचवी आणि अकरावीचे शैक्षणिक वर्ष ६ जून २०२६ पासून सुरू होणार असून, इतर वर्गांसाठीच्या सत्रांच्या आणि सुट्ट्यांच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत. संचालनालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, हे वेळापत्रक राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना लागू असेल.



नव्या शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र १ एप्रिल २०२६ पासून सुरू होईल आणि १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत चालेल. त्यानंतर दुसरे सत्र १२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होऊन २४ मार्च २०२७ रोजी संपणार आहे. शालेय कामकाजाच्या दिवसांबाबत शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी संपूर्ण शैक्षणिक वर्षात एकूण कामकाजाचे दिवस २२० पेक्षा कमी नसावेत, तर प्रत्यक्ष अध्यापनाचे दिवस किमान २०० असणे अनिवार्य आहे.




सणासुदीच्या सुट्ट्यांबाबत बोलायचे झाले तर, गणेश चतुर्थीनिमित्त १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दिवाळीची सुट्टी २ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२६ या काळात असेल, तर नाताळची सुट्टी २४ डिसेंबर २०२६ ते २ जानेवारी २०२७ पर्यंत असेल. उन्हाळी सुट्ट्या १ मे २०२७ पासून सुरू होऊन ५ जून २०२७ पर्यंत राहतील. याशिवाय, शाळा प्रमुखांना त्यांच्या अधिकारात १० स्वेच्छा सुट्ट्या देण्याची मुभा असेल, यापैकी ४ सुट्ट्या गणेश चतुर्थीसाठी आणि उर्वरित ६ सुट्ट्या पालक-शिक्षक संघाशी चर्चा करून ठरवता येतील.


alright's school chale hum : Latest News, Photos, Videos on alright's school  chale hum by IBC24.in


परीक्षेच्या वेळापत्रकाबाबतही संचालनालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे. पहिली सत्र परीक्षा १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे, तर दुसरी सत्र परीक्षा शक्यतो १३ मार्च २०२७ पर्यंत घेण्यात यावी. अंतिम परीक्षेचा निकाल ३१ मार्च २०२७ पूर्वी जाहीर केला जाणार नाही, याचीही नोंद शाळांनी घ्यायची आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तास दररोज किमान ५ तास ३० मिनिटे असावेत, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा