आगरवाडा-चोपडेत ओहळावर पक्के बांधकाम केल्याने वाट बंद

जलसिंचन खात्याच्या अधीक्षकांनी अन्य अधिकाऱ्यांसह केली पाहणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
आगरवाडा-चोपडेत ओहळावर पक्के बांधकाम केल्याने वाट बंद

चोपडे-आगरवाडा सीमेवरील सरकारी ओहळावर केलेले अतिक्रमण. (निवृत्ती शिरोडकर)

पेडणे : आगरवाडा-चोपडे (Agarwada-Chopde) सीमेवरील एका ड्रिलिंग युनिटने (Drilling unit) पारंपरिक ओहळावर पक्के बांधकाम (Permanent construction on the stream) करून पाण्याचा प्रवाह अडवल्याप्रकरणी जलसिंचन खात्याने (Irrigation Department) कडक पावले उचलली आहेत. या तक्रारीची दखल घेत खात्याचे अधीक्षक प्रदीप नाईक यांनी मंगळवारी आपल्या पथकासह घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. याविषयी जलसिंचन खात्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती.
येथील पारंप‍रिक मीठ व्यावसायिक आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ड्रिलिंग युनिटने नियमांचे उल्लंघन करून कुंपण आणि पक्के बांधकाम केले आहे. यामुळे डोंगर माथ्यावरून येणारे पाणी अडवले गेल्याने पावसाळ्यात भातशेती आणि मिठागरांत मोठ्या प्रमाणात पाणी साचते. चोपडे येथून मिठागराकडे जाणारी पारंपरिक पायवाट पूर्णपणे बंद झाली आहे. याविषयी लेखी तक्रारी करूनही अद्याप त्याची कोणीच दखल घेतलेली नाही. दरम्यान, स्थानिकांनी ग्रामसभेतही यावर आवाज उठवून संबंधित बिगर गोमंतकीय मालकावर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, या बांधकामाविषयी नगर नियोजन खात्याकडेही तक्रार करण्यात आल्याने खात्याचे अधिकारी ३ फेब्रुवारी रोजी पाहणी करण्यासाठी येणार होते. मात्र, ऐनवेळी ही भेट रद्द झाल्याचे ग्रामपंचायतीला कळवण्यात आले, ज्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कडक कारवाईचे संकेत
तक्रार केल्यानंतर जलसिंचन खात्याचे अधीक्षक प्रदीप नाईक यांनी पाहणीनंतर स्पष्ट केले की, या अतिक्रमणाचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. नियमबाह्य पद्धतीने केलेल्या या बांधकामावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी स्थानिकांना दिले आहे.

हेही वाचा