तिरूमला मल्टीस्टेट सोसायटीला दिलेली एनओसी घेतली मागे

ऑडिट अहवालात कसूर, अटींच्या भंगाचा ठपका

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
तिरूमला मल्टीस्टेट सोसायटीला दिलेली एनओसी घेतली मागे

पणजी : ऑडिट अहवाल (Audit Report) सादर करण्यास आलेले अपयश व अटींचा भंग करण्यात आल्याने तिरूमला तिरूपती बहुराज्य सहकारी सोसायटीला (Tirumalla Tirupati Multistate Co-operative Credit Society)  झटका बसला आहे. गोव्यात १३ ठिकाणी शाखा सुरू करण्यासाठी दिलेला ‘ना हरकत’ दाखला (एनओसी) (NOC)  सहकार निबंधकांनी मागे घेतला आहे. यामुळे या सोसायटीच्या राज्यातील विस्ताराला सध्या तरी ब्रेक लागला आहे. 

माशेल महिला सहकारी बँक, विजनरी सहकारी बँक अशा बँकांतील गैरव्यवहारामुळे हजारो ठेवीदारांचे लाखोंनी रूपये बुडाले आहेत. सहकारी सोसायट्या व बँकांतील गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला अद्याप पूर्णत: यश आलेले नाही. दुसरीकडे नवीन सहकारी सोसायट्या व त्यांच्या शाखाही उघडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर तिरूमला तिरूपती सोसायटीला १३ शाखा उघडण्यासाठी दिलेली मान्यता सहकार निबंधकांनी रद्द केली आहे. 

सहकार निबंधकांनी तिरूमला तिरूपती बहुराज्य सहकारी क्रेडीट सोसायटीला ३१ जुलै २०१४ व २८ जून २०१८ रोजी शाखा स्थापन करण्यासाठी एनओसी देण्यात आली होती. अलीकडेच झालेल्या पाहणीत खालील गोष्टी आढळून आल्या: 

- कायद्यानुसार आवश्यक असलेला ऑडिट अहवाल सोसायटीने सादर केलेला नाही

- कागदपत्रांची तपासणी व पाहणीला सहकार्य नाही

- एनओसी देण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन

- सहकार निबंधकांच्या नोटिसांना प्रतिसाद न देणे तसेच उपस्थित न राहणे 

या कारणास्तव सहकार निबंधकांनी शाखा उघडण्यासाठी दिलेली एनओसी रद्द केली आहे. एनओसी मागे घेण्याच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेने सोसायटीकडे आर्थिक व्यवहार अथवा गुंतवणूक करताना सतर्क रहावे, असे आदेशात म्हटले आहे. तक्रार अथवा अधिक माहिती हवी असल्यास जनतेने संबंधित यंत्रणेकडे संपर्क साधावा, असे सहकार खात्याने कळविले आहे.

हेही वाचा