
पणजी :पणजी : रेल्वे उड्डाणपुलाच्या (Railway Flyover) कामासाठी गवंडाळी रस्ता ३० मे २०२६ पर्यंत सकाळी आणि रात्री बंद राहणार असे गोवा पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळाने (Goa State Infrastructure Development Corporation) कळीत केले आहे. हा रस्ता रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत आणि सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. रस्ता सकाळी ६ ते १० आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत वाहतुकीला खुला राहणार.
गवंडाळी रस्ता ३० मे २०२६ पर्यंत सकाळी आणि रात्री बंद राहणार असल्याने खोर्ली आणि बाणस्तारी मार्गाने वाहने हाकावी लागणार आहेत. गवंडाळी रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाण पुलाचे काम गेल्या वर्षी सुरू झाले. पाया रचण्याचे व खांब (पिलार) उभारण्याचे काम पू्र्ण झाले आहे. आता खांबांवर स्लॅब (लाद्या) घालण्याचे काम सुरू होणार आहे. यासाठी रात्री तसेच दिवसाची वाहतूक बंद करण्याशिवाय पर्याय असणार नाही. सकाळी ६ ते १० पर्यंत आणि संध्याकाळी ५ ते ६ पर्यंत वाहतुकीचे प्रमाण जास्त असते. बाणस्तारी, खोर्ली मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून रस्ता खुला ठेवण्याचा निर्णय झाला आहे. जुने गोवा फिशरमॅन प्रशिक्षण केंद्र ते धेंपो फुटबॉल मैदानापर्यंतचा रस्ता बंद असणार आहे. इतर रस्ता सुरू राहणार आहे.